नोकरी मिळेल, खेळाडू घडवा - तावडे

vinod-tawde
vinod-tawde

पुणे - कौशल्य सिद्ध करणाऱ्या खेळाडूंना नोकरीत पाच टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. आम्ही नोकरी देऊ, पण खेळाडूंकडून नवे खेळाडू घडविण्याचे आश्‍वासन हवे, अशा शब्दांत राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी थेट खेळाडूंना आवाहन केले.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना मंगळवारी महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या वेळी तावडे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘खेळाडूंना नोकरी मिळत नाही, अशी नेहमी ओरड होत होती. आम्ही हा प्रश्‍न सोडवला आहे. खेळाडूंना पाच टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत. खेळाडूचा आर्थिक विकास व्हायला हवा, हे आम्हाला मान्य आहे.

आम्ही त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार मनासारखी नोकरी देऊ; पण त्यांनी पुढे जाऊन चार नवे खेळाडू घडविण्याचे आश्‍वासन द्यावे. ज्या खेळाने मला नोकरी दिली, त्या खेळाचे चार नवे खेळाडू घडवायचे हा निश्‍चय खेळाडूने करायला हवा. खेळाडूने क्रीडा खात्यात नोकरी पत्करावी. नोकरीच्या कालावधीत त्याने फक्त सही करावी आणि खेळावे. त्यानंतर मैदानात आपल्यासारखे खेळाडू घडवावेत इतकेच आमचे म्हणणे आहे.’’

राज्याच्या क्रीडा धोरणाविषयी बोलताना तावडे यांनी ते अधिक सक्षम असल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘‘राज्याचे क्रीडा धोरण खेळाडूंच्या हिताचे आहे. क्रीडा संस्कृती कशी निर्माण होईल याचा विचार जास्त केला आहे. उपलब्ध असणाऱ्या खेळाडूला जपण्याबरोबर मोबाईल आणि सोशल मीडियातून बाहेर पडून युवा पिढीने मोठ्या प्रमाणावर मैदानावर येण्याची गरज आहे. तरच, क्रीडा धोरणातील क्रीडा संस्कृती प्रत्यक्षात उतरेल आणि त्यासाठीच आमचे प्रयत्न असतील.’’

या वेळी आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबत, दत्तू भोकनळ यांना रोख ५० लाख, तर सायली केरिपाळे, सोनाली शिंगटे, श्‍वेता शेरगीवार, वर्षा गौतम या रौप्यपदक विजेत्यांना ३० लाख आणि गिरीश इरनाक, रिशांक देवाडिगा, हीना सिद्धू, महेश माणगावकर या ब्राँझपदक विजेत्यांना रोख २० लाख रुपये देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या प्रशिक्षकांचाही या वेळी गौरव करण्यात आला.

खेळाडूंच्या वतीने मनोगत व्यक्त करताना राही सरनोबत हिने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रोत्साहनाबद्दल आभार मानले. त्याचवेळी क्रीडा धोरण बदलत्या काळानुसार बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. समारंभास क्रीडा आयुक्त सुनील केंदरेकर, सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्यासह विविध क्रीडा अधिकारी उपस्थित होते.

खेळाडूंनी आपली कारकीर्द घडवत असताना भविष्यकाळाचाही विचार करायला हवा. ज्या खेळाने आपल्याला मोठे केले, त्या खेळात आणखी खेळाडू निर्माण करण्यासाठी त्यांनी आपली अधिक ताकद वापरायला हवी. शासन त्यांच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभे राहील.
- विनोद तावडे, महाराष्ट्राचे क्रीडामंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com