सक्षम संघनिर्मितीसाठीच जास्त खेळाडू

पीटीआय
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

गहुंजे - ऑस्ट्रेलियाचा मायदेशात सामना करण्यासाठी सज्ज होत असलेल्या भारतीय संघात १६ खेळाडू आहेत. याशिवाय काही नवोदित खेळाडूसुद्धा संघाच्या तयारीसाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. अशा जम्बो संचातूनच  सक्षम संघनिर्मिती करण्याचे ध्येय असल्याचे भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले.

गहुंजे - ऑस्ट्रेलियाचा मायदेशात सामना करण्यासाठी सज्ज होत असलेल्या भारतीय संघात १६ खेळाडू आहेत. याशिवाय काही नवोदित खेळाडूसुद्धा संघाच्या तयारीसाठी आमंत्रित करण्यात आले आहेत. अशा जम्बो संचातूनच  सक्षम संघनिर्मिती करण्याचे ध्येय असल्याचे भारतीय प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले.

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी जयंत यादव, कुलदीप यादव या फिरकी गोलंदाजांनी तयारीस हातभार लावला. याशिवाय डावखुरा अनिकेत चौधरी, नथू सिंग, बसील थम्पी हेसुद्धा नेट प्रॅक्‍टिसमध्ये सक्रिय आहेत. याविषयी कुंबळे म्हणाले, की पूर्वी दौऱ्यावर जाताच किंवा सामन्याच्या दिवशी सकाळी खेळाडू जायबंदी होण्याचे प्रकार घडले. अशा वेळी सक्षम पर्याय असणे गरजेचे असते. भरगच्च वेळापत्रक पाहिल्यास स्थानिक क्रिकेटमधील गुणी गोलंदाज हेरण्यास पुरेसा वेळ मिळणे शक्‍य नाही. अशा वेळी असा संच उपयुक्त ठरतो. अंतिम संघात केवळ ११ खेळाडूंनाच संधी मिळते; पण इतर खेळाडूसुद्धा तयारीत आणि पर्यायाने यशासाठी हातभार लावू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविण्यासाठी आम्ही कार्यपद्धती निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, त्या प्रक्रियेचा या खेळाडूंनी सुद्धा घटक बनण्याची गरज आहे.

गेल्या तीन मालिकांमध्ये भारतीय संघाला वेगवेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागला. काही ठिकाणी प्रथमच कसोटी सामना झाला. अशा वेळी खेळपट्टी किंवा नाणेफेकीला अवास्तव महत्त्व न देता पूर्वतयारीवर लक्ष केंद्रित केल्याचे कुंबळे यांनी नमूद केले. या वाटचाली एखाद-दोन अपवाद वगळता मोक्‍याच्या क्षणी भारतीय संघाची सरशी झाली. चेन्नई, मुंबई, कोलकाता या कसोटींमध्ये संधी वाटत नसतानाही बाजी मारली. याचा अर्थ खेळाडू मोक्‍याचे क्षण हेरण्यात आणि त्या वेळी कामगिरी उंचावण्यात यशस्वी ठरत असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

 ऑस्ट्रेलियाचा संघ आक्रमक खेळ करतो याची सर्वांना कल्पना आहे; पण इतर कोणत्याही मालिकेप्रमाणेच याकडे पाहण्याचा दृटिकोन आहे. पुण्यातील पहिल्या कसोटीतील पहिले सत्र महत्त्वाचे असेल, असेही त्यांनी नमूद केले.

जम्बो थॉट्‌स
    भारतीय संघाचे प्रशिक्षकपद मिळाले तेव्हा हा एक सन्मान असल्याची भावना मी व्यक्त केली होती. हा संघ सक्षम आणि स्वावलंबी बनत आहे आणि याचे विलक्षण समाधान आहे.
    मैदानावर आणि मैदानाबाहेर सुद्धा खेळाडू आव्हानांना सामोरे जात त्यातून मार्ग काढत आहेत. सल्ला मिळावा म्हणून दुसऱ्यावर अवलंबून न राहता ते स्वतः परिस्थितीचा अंदाज घेतील आणि आव्हानांवर मात करू शकतील, अशी कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
    कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अश्विनने सर्वाधिक कमी कसोटींमध्ये २५० विकेट घेतल्या. ही कामगिरी अनोखी आहे.
    कर्णधार विराट कोहलीने मोठेच योगदान दिले आहे. त्याची कामगिरी संघाच्या वाटचालीत महत्त्वाची.

Web Title: jumbo team