कुमार नेमबाजांचा पदक धडाका कायम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

आशियाई स्पर्धेत भारताचे वरिष्ठ नेमबाज ऑलिंपिक पात्रतेचा वेध घेण्यास अपयशी ठरत असतानाच कुमार स्पर्धक पदकांची लयलूट करीत आहेत. कुमार नेमबाजांनी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पाच सुवर्णपदकांसह दहा पदके जिंकली. त्यांनी भारताची आतापर्यंतची 23 पैकी 18 पदके जिंकली आहेत.

मुंबई : आशियाई स्पर्धेत भारताचे वरिष्ठ नेमबाज ऑलिंपिक पात्रतेचा वेध घेण्यास अपयशी ठरत असतानाच कुमार स्पर्धक पदकांची लयलूट करीत आहेत. कुमार नेमबाजांनी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पाच सुवर्णपदकांसह दहा पदके जिंकली. त्यांनी भारताची आतापर्यंतची 23 पैकी 18 पदके जिंकली आहेत.

लुसैल नेमबाजी संकुलातील ट्रॅप स्पर्धेतील कुमार गटातील यश सुखावणारे होते. या प्रकारात विवियन कपूरने भारताच्याच भोवनीस मेंडिरात्ता याला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. त्यांनी यापूर्वी मानवजीत राठोडच्या साथीत सांघिक सुवर्णपदक जिंकले होते. विवियनने स्पर्धेतील त्याचे तिसरे सुवर्णपदक जिंकताना मनीषा कीरसह मिश्र ट्रॅप दुहेरीत बाजी मारली.

इशा सिंगनेही दोन सुवर्णपदके जिंकली. तिने 10 मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक तसेच सांघिक स्पर्धेत ही कामगिरी केली. तिने प्राथमिक फेरीतील 579 गुणांना अंतिम फेरीतील 217.6 गुणांची जोड देत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. इशाने प्रिया आणि युविका तोमरसह भारतास 1721 गुणांसह सुवर्णपदक जिंकून दिले. हे जागतिक विक्रमी गुण आहेत.

भक्ती खामकरला सुवर्ण
भक्ती खामकरने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कुमारी गटात सुवर्णपदक जिंकताना अंतिम फेरीत 453.1 गुणांचा वेध घेतला. तिने चीनच्या यू चिआनयुआन हिला जवळपास चारहून जास्त गुणांनी मागे टाकले. भक्तीने आयुषी पोद्दार आणि निश्‍चलच्या साथीत याच प्रकारात सांघिक रौप्यपदक जिंकले होते.

चिंकी यादवला पात्रतेची आशा
महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात चिंकीला ऑलिंपिक पात्रतेची आशा आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीच्या पहिल्या टप्प्यानंतर ती पाचवी आहे. तिने 292 गुणांची लक्षवेधक कामगिरी केली आहे. या प्रकारात राहीने यापूर्वी भारतास एक पात्रता मिळवून दिली आहे. चिंकीला दुसरी तसेच अखेरची पात्रता मिळू शकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: junior shooters continue to win medals in asian championship