कबड्डी संघनिवडीपासून महाराष्ट्राचे खेळाडू दूर? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

मुंबई : आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धेतील पदकविजेत्या भारतीय संघास आव्हान देणारा संघ निवडण्यासाठी होत असलेल्या चाचणी शिबिरापासून महाराष्ट्राचे खेळाडू अद्याप दूरच आहेत; मात्र हे खेळाडू लवकरच या शिबिरात सहभागी होतील, असे सांगितले जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या कबड्डी संघनिवडीत गैरप्रकार झाले आहेत, त्यामुळे नव्याने चाचणी घेण्याची मागणी करणारी याचिका राजरत्नम आणि होनप्पा या माजी कबड्डीपटूंनी दिल्ली उच्च न्यायालयात सादर केली होती. मात्र, यात वेळ गेल्यामुळे न्यायालयाने एशियाडसाठी गेलेला संघ आणि पर्यायी संघ यांच्यातील सामना घेण्याची सूचना केली.

मुंबई : आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धेतील पदकविजेत्या भारतीय संघास आव्हान देणारा संघ निवडण्यासाठी होत असलेल्या चाचणी शिबिरापासून महाराष्ट्राचे खेळाडू अद्याप दूरच आहेत; मात्र हे खेळाडू लवकरच या शिबिरात सहभागी होतील, असे सांगितले जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या कबड्डी संघनिवडीत गैरप्रकार झाले आहेत, त्यामुळे नव्याने चाचणी घेण्याची मागणी करणारी याचिका राजरत्नम आणि होनप्पा या माजी कबड्डीपटूंनी दिल्ली उच्च न्यायालयात सादर केली होती. मात्र, यात वेळ गेल्यामुळे न्यायालयाने एशियाडसाठी गेलेला संघ आणि पर्यायी संघ यांच्यातील सामना घेण्याची सूचना केली. तसेच यासंदर्भातील अहवाल सादर करण्याची सूचना केली आहे. 

आपण निर्णय देईपर्यंत एशियाड कबड्डीपटूंना पदक जिंकल्याचे बक्षीस देऊ नये, असेही सांगितले आहे. कर्नाटकला सुरू असलेल्या या संघनिवडीच्या शिबिरासाठी आत्तापर्यंत राजस्थान, हरियाना, हिमाचल प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगण, बंगालचे खेळाडू आले असल्याचे होनप्पा यांनी सांगितले. महाराष्ट्रातील खेळाडूंची आम्हाला प्रतीक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील कबड्डी संघटकानुसार काही खेळाडू या शिबिरास जाण्यास तयार आहेत, त्यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही पाठबळ आहे. त्यात एशियाडच्या प्राथमिक शिबिरासाठी निवडलेल्या पण अंतिम संघात न आलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे, असे सांगितले जात आहे. 

पुन्हा न्यायालयीन संघर्षाची चिन्हे 
एशियाड संघ आणि निवडलेला संघ यांच्यात दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये 15 सप्टेंबरला लढत अपेक्षित आहे. या संघनिवडीची प्रक्रिया भारतीय कबड्डी महासंघानेच सुरू करावी. अंतिम निवड चाचणी दिल्लीत घेण्याची सूचनाही केली होती. त्यासाठी याची माहिती महासंघाच्या तसेच संलग्न संघटनांच्या संकेतस्थळावर देण्यासही सांगितले होते. त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. त्यामुळे यासंदर्भात न्यायालयात दाद मागण्याचा विचार होत आहे. याबाबतची याचिका कदाचित मंगळवारी (ता. 28) दाखल होण्याची शक्‍यता आहे. 
 

Web Title: Kabaddi teammates remove Maharashtra players