परिस्थितीशी दोन हात करत कमावले नाव

काटोलचा खो-खोपटू फैजान खान पठाणची गरुडझेप
Katol Faizan Khan Pathan Ultimate Kho Kho League
Katol Faizan Khan Pathan Ultimate Kho Kho League

नागपूर : क्रीडा क्षेत्रात गरुडझेप घेण्यासाठी पैसा, अनुकूल वातावरण किंवा ‘स्पोर्ट्स बॅकग्राऊंड’ असणे आवश्यक नाही. छोट्याशा गावातील एका सर्वसाधारण घरातील मुलगाही मोठे स्वप्न पाहून प्रगतीचे शिखर गाठू शकतो. काटोलचा युवा खो-खोपटू फैजान खान पठाणने ते सिद्ध करून दाखविले. फैजानने जिद्द व मेहनतीच्या जोरावर प्रतिष्ठेच्या अल्टिमेट खो-खो लीगपर्यंत झेप घेऊन आपल्या परिवारासह काटोलच्याही शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

२१ वर्षीय फैजानची येत्या १४ ऑॅगस्टपासून बालेवाडी (पुणे) येथे सुरू होत असलेल्या अल्टिमेट खो-खो लीग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. मुंबई खिलाडीज संघाने तीन लाख रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतले आहे. देशभरातील दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेसाठी निवड होणे, ही माझ्यासाठी आनंद व अभिमानाची बाब असून, स्वतःला सिद्ध करत फ्रेंचायसीचा विश्वास सार्थ ठरविण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे फैजानने सांगितले.

काटोलच्या विदर्भ युथ क्रीडा मंडळाचा खेळाडू असलेल्या फैजानने संघर्ष अगदी जवळून पाहिला आहे. फैजानच्या परिवारात आईवडिलांसह एकूण सहा जण आहेत. वडील शेरखान हातमजुरी करतात, तर व आई नसरीन गृहिणी आहे. परिवारात कुणीही खेळाडू नाही किंवा फारसे शिकलेलेदेखील नाही. अशा परिस्थितीत फैजानने स्वबळावर खो-खोसारख्या परंपरागत खेळात छाप सोडली. रुईया हायस्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकत असताना फैजान सर्वप्रथम खो-खोच्या प्रेमात पडला.

प्रशिक्षक अनुप खराडे यांनी त्यांच्यातील टॅलेंट ओळखून त्याला ‘मोटिव्हेट’ केले. अल्पावधीतच फैजानने आपली गुणवत्ता सिद्ध करत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतली. फैजानने आतापर्यंतच्या करिअरमध्ये दोनवेळा ‘खेलो इंडिया गेम्स’मध्ये आणि तितक्याच वेळा राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या चारही स्पर्धांमध्ये त्याने सुवर्णपदके जिंकली. याशिवाय इतरही अनेक स्पर्धांमध्ये त्याने चमकदार प्रदर्शन केले. या सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारावरच त्याची खो-खो लीगसाठी निवड झाली आहे.

देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न

इतर खेळाडूंप्रमाणे फैजानचेही भविष्यात देशाकडून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आहे. विशेषतः आशियाई व जागतिक स्पर्धेत खेळण्याची इच्छा त्याने बोलून दाखविली. खो-खो लीगमध्ये चांगली कामगिरी केल्यास निश्चितच स्वप्नपूर्ती होणार असल्याचे त्याने सांगितले. शिवाय ‘जॉब’ मिळायलादेखील मदत होणार असल्याचे सध्या नबिरा महाविद्यालयात बी. ए. द्वितीय वर्षात शिकत असलेला फैजान म्हणाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com