भाग्यश्री फंडचे निर्विवाद वर्चस्व; संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटीलला सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी असलेल्या भाग्यश्री फंड हिने अपेक्षेप्रमाणे आपल्या गटात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत खाशाबा जाधव चषक या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा फड गाजवला.
भाग्यश्री फंडचे निर्विवाद वर्चस्व
भाग्यश्री फंडचे निर्विवाद वर्चस्वSAkal

उदगीर : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी किताबाची मानकरी असलेल्या भाग्यश्री फंड हिने अपेक्षेप्रमाणे आपल्या गटात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत खाशाबा जाधव चषक या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा फड गाजवला. याचसह संजना बागडी, आश्लेषा बागडे, गौरी पाटील यांनीही आपापल्या वजनी गटात बाजी मारत सुवर्णपदकाला गवसणी घातली.

महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये ही राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुरू आहे. श्रीगोंद्याच्या (जि. नगर) भाग्यश्री फंड हिने ६२ किलो गटातील अंतिम लढतीत सांगलीच्या पूजा लोंढेला पहिल्या फेरीतच लोळविले.

लढतीला सुरुवात होताच भाग्यश्रीने एकेरी पटात घुसून पूजाच्या पाठीवर स्वार होत दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर भाग्यश्रीच्या मगरमिठीतून पूजाला स्वत:ची सुटका करून घेता आली नाही.

मग सलग आठ गुणांची कमाई करीत भाग्यश्रीने पहिल्या फेरीतच पूजावर मात करीत सुवर्णपदक जिंकले. भाग्यश्रीने फायनलपर्यंतच्या प्रवासातही एक मिनिटांतच सर्व कुस्त्या जिंकून उदगीरचा राज्यस्तरीय आखाडा गाजविला, हे विशेष. पूजा लोंढे रौप्यपदकाची मानकरी ठरली, तर साताऱ्याच्या सिद्धी कणसेने ब्राँझपदकाची कमाई केली.

महिला विभागाच्या ७२ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सांगलीच्या संजना बागडी हिने लातूरच्या आराधना नाईकचा १०-० फरकाने फडशा पाडला. आराधनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर साताऱ्याची प्रीती पाटील व नगरची सोनिया सरक यांना ब्राँझपदके मिळाली.

५७ किलो गटात साताऱ्याची आश्लेषा बागडे व लातूरची अंकिता जाधव यांच्यात तोडीस तोड लढत झाली. लढत २-२ अशी बरोबरीत असताना आश्लेषाने चितपट कुस्ती मारून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

रौप्यपदकावर समाधान मानावे लागल्याने अंकिता निराश झाली. पिंपरी-चिंचवडची निर्मिती मुन्हे व कोल्हापूर शहरची श्रद्धा कुंभार यांनी ब्राँझपदकांची कमाई केली. ५३ किलो गटातील अंतिम लढतीत कोल्हापूरच्या गौरी पाटीलने कोल्हापूरच्याच तृप्ती गुट्टा हिला १२-३ गुण फरकाने धूळ चारत सुवर्णपदकाची कमाई केली. सेजल धरपळे व पल्लवी बागडी यांना ब्राँझपदके मिळाली.

श्रीकांत, सूरज, पार्थ, राकेश, सतीशला सुवर्ण

खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या पुरुष विभागात कोल्हापूरचा सूरज अस्वले व नाशिक जिल्ह्याचा पवन डोन्नर यांच्यातील ६१ किलो गटातील अंतिम लढत अतिशय लक्ष्यवेधी ठरली.

अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या या कुस्तीत अखेर सूरजने १२-७ गुण फरकाने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले, तर पवनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात कोल्हापूरचा विजय डोंगरे व पुणे शहरचा अमोल वालगुडे ब्राँझपदकाचे मानकरी ठरले.

६० किलो गटात कोल्हापूरच्या श्रीकांत कामण्णने अंतिम लढतीत सोलापूरच्या आकाश सरगरचा ७-४ गुण फरकाने पराभव करीत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. आकाशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर नाशिक जिल्ह्याचा अतुल मेदडे व कोल्हापूरचा प्रतीक पाटील ब्राँझपदकाचे मानकरी ठरले.

६७ किलो गटात पुणे शहरच्या पार्थ कंधारेने जळगावच्या अरबाज पठाणचा ८-० गुण फरकाने धुव्वा उडवून सुवर्णपदक पटकाविले. अरबाजला रौप्यपदक मिळाले, पुणे जिल्ह्याचा वैष्णव आडकर व कोल्हापूरचा माऊली टिपुगडे यांनी ब्राँझपदके जिंकली.

७४ किलो गटात कोल्हापूरच्या राकेश तांबुळकरने कोल्हापूरच्याच अभिजीत भोसलेचा २-१ असा पराभव करीत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. या गटात पुणे जिल्ह्याचा अनिल कचरे व कोल्हापूरचा सातपा हिरगुडे यांनी ब्राँझपदकाची माळ आपल्या गळ्यात घातली.

९७ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सांगलीच्या सतीश मुंढेने कोल्हापूरच्या रोहन रेडेचे आव्हान ९-५ फरकाने मोडून काढले. रोहनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सोलापूरचा निकेतन पाटील व लातूरचा योगीराज नागरगोजे यांना ब्राँझपदके मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com