कुंडलच्या महाराष्ट्र मैदानात खत्री विजयी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

कुंडल - येथे झालेल्या महाराष्ट्र मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत मौसम खत्री विजयी झाला. द्वितीय कुस्तीत कृष्ण कुमार विजयी झाला. दोन्ही कुस्त्या रटाळ झाल्याने कुस्ती शौकिनांची निराशा झाली. 

कुंडल - येथे झालेल्या महाराष्ट्र मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत मौसम खत्री विजयी झाला. द्वितीय कुस्तीत कृष्ण कुमार विजयी झाला. दोन्ही कुस्त्या रटाळ झाल्याने कुस्ती शौकिनांची निराशा झाली. 

भारत केसरी मौसम खत्री (सोनिपत आखाडा) विरुद्ध  हिंदकेसरी प्रिन्स कोहली (पंजाब) सुरवातीची १० मिनिटे अंदाज घेत होते. नंतर कुस्ती बराच वेळ रटाळ राहिली. एकमेकांचा अंदाज घेतल्या नंतरही लढण्यास तयार होत नव्हते. मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब लाड यांनी कुस्ती निकाली झाली तरच बक्षिसाची रक्कम मिळेल; अन्यथा रिकाम्या हातांनी परतावे लागेल, असे सांगितल्यानंतर काही वेळाने ते लढण्यास तयार झाले. यात खत्रीने मुलतानी डावावर प्रिन्स कोहलीला आस्मान दाखवले.
हिंदकेसरी कृष्णकुमार (सोनिपत आखाडा) विरुद्ध अजय गुज्जर (हिमाचल प्रदेश) यांच्यातीलही कुस्तीही रटाळ झाली. कुस्ती निकालीच करण्याचे कुस्ती समितीने आदेश दिल्यानंतर कृष्णकुमारने एकेरी कसावर हिंदकेसरी अजय गुजरला आस्मान दाखवले. रात्री पावणेनऊपर्यंत मैदान चालले.

सागर बिराजदार (गोकुळ  तालीम, पुणे) विरुद्ध समाधान पाटील (खवसपूर तालीम) यांच्यातील कुस्ती तासानंतर बरोबरीत सोडवण्यात आली. माऊली जमदाडे (गंगावेश, कोल्हापूर) विरुद्ध गौरव मच्छिवारा (पंजाब) यांच्यातील कुस्ती चटकदार झाली. सातव्या मिनिटाला गौरववर माऊलीने ताबा घेतला. लाखो कुस्ती शौकिनांना उत्कंठा लागलेल्या कुस्तीत शेवटी मच्छिवाराने माऊलीवर घुटना डावावर विजय मिळवला. 
भारत मदने (पुणे) याने रामवीर (सोनिपत आखाडा) याच्यावर घुटना डावावर विजय मिळवत सत्यविजय केसरी किताब पटकावला. आर. के. सावत पाटील यांनी पुरस्कृत केलेली एक लाखाची कुस्ती संतोष सुतार (बेनापूर) याने समोरून आकडी डावावर जिंकली. त्याने समीर देसाई (पुणे) याला आस्मान दाखविले. 

अन्य निकाल असे ः राजेंद्र सूळ (सातारा तालीम) वि. वि. सुनील शेवंतकर (कुर्डुवाडी), महेश शिंदे (खवसपूर) वि. वि. देवा गुज्जर (हिमाचलप्रदेश), अनिल धोत्रे (बेनापूर) वि. वि. संतोष लवटे (मोतीबाग, कोल्हापूर), सिकंदर शेख (गंगावेश कोल्हापूर) वि. वि. हणमंत पुरी (मामासाहेब मोहोळ, पुणे),  धीरज पवार (शाहूपुरी कोल्हापूर), वि.वि. हर्षवर्धन थोरात (गंगावेश, कोल्हापूर),  विक्रम घोरपडे (खवसपूर) वि. वि.  नवनाथ इंगळे . 

अन्य विजयी मल्ल ः वाजीद पटेल, तुषार निकम, उदय लोंढे, प्रथमेश पाटील, मुकुंद यादव, सौरभ सव्वाशे, संग्राम सूर्यवंशी (क्रांती कारखाना), अक्षय जाधव (साप), युवराज बंडगर (राजारामबापू कारखाना), नामदेव केसरी, कृष्णा पवार, अमोल नरळे (भोसले तालीम), अमर पाटील, अक्षय मदने, किशोर पाटील (बेणापूर), तानाजी विरकर. मुलींच्या कुस्तीमध्ये ऋतुजा जाधव हिच्यावर संजना बांगडी हिने लपेट डावावर विजय मिळवला. 

Web Title: Khatri won on Kundals Maharashtra Maidan