जाणून घ्या आयपीएलमागच्या आर्थिक उलाढाली...

विनायक होगाडे
Thursday, 17 September 2020

या सिझनपासून आयपीएलची स्पॉन्सरशीप ही 'ड्रीम इलेव्हन' या कंपनीने घेतली आहे. ड्रीम इलेव्हन ही कंपनी इंडियन फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म असून 2.22 अब्ज रुपयांना ही स्पॉन्सरशीप दिली गेली आहे.

भारतीयांचा सर्वात आवडता खेळ म्हणजे क्रिकेट... इथं प्रत्येक गल्लीत एक सचिन आणि धोनी असतोच असतो... मुंबई इंडियन्स भारी की चेन्नईची किमया न्यारी... यावर फॅन्स लोकांमध्ये आयपीएल सुरू व्हायच्या आधीपासूनच ईर्ष्या आणि खिजवाखिजवी सुरू होते... पण, तुम्हाला या आयपीएलमागचे अर्थकारण माहितीय का?

आयपीएलचा 13 वा सिझन 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे...निर्विवादपणे आयपीएल ही एक जगातील सर्वात यशस्वीपणे खेळवली जाणारी स्पर्धा आहे... या स्पर्धेला प्रचंड लोकप्रियता असल्यामुळे सर्वधिक पैसे हे अर्थात जाहिरातींच्या यशस्वीतेमुळे मिळतात. 

आयपीएल आणि आर्थिक उलाढाल...

2019 मध्ये झालेल्या आयपीएलबद्दल सांगायचं झालं तर 6.8 अब्ज डॉलर इतकी आर्थिक उलाढाल गेल्या वर्षी झाली होती. यातला सर्वात जास्त उत्पन्नांचा वाटा हा 'मीडिया राईट्स'मधून मिळाला होता. जो 8 अब्ज रुपयांहून अधिक होता. मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील टीम ही सर्वात अधिक ब्रँड व्हॅल्यू असलेली टीम आहे. या टीमची ब्रँड व्हॅल्यू ही 8 अब्ज रुपयांहून अधिक आहे. विजेत्या टीमला 500 दशलक्ष रुपये मिळतात तर उपविजेत्या टीमला 125 दशलक्ष रुपये मिळतात. नियमानुसार जिंकलेल्या रकमेमधील अर्धी रक्कम ही खेळाडूंमध्ये वाटली जाते. 

आयपीएल आणि स्पॉन्सरशीप...

सुरवातीला आयपीएल ही डीएलएफ आयपीएल होती. डीएलएफ या कन्स्ट्रक्शन कंपनीने 2012 पर्यंत आयपीएलला स्पॉन्सरशीप दिली होती. 2008 मध्ये सुरुवातीला ही स्पॉन्सरशीप 500 दशलक्ष रुपयांची होती. नंतर 2017 ते 2022 या कालावधीसाठी आयपीएल हे 'विव्हो आयपीएल' झालं होतं. विव्हो या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने 4.4 अब्ज रुपयांना ही स्पॉन्सरशीप दिली होती. मात्र भारत आणि चीन या दोन्ही देशांत सध्या सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही स्पॉन्सरशीप रद्द करण्यात आली आहे. सध्या या सिझनपासून आयपीएलची स्पॉन्सरशीप ही 'ड्रीम इलेव्हन' या कंपनीने घेतली आहे. ड्रीम इलेव्हन ही कंपनी इंडियन फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म असून 2.22 अब्ज रुपयांना ही स्पॉन्सरशीप दिली गेली आहे.

हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी ट्रेंड होतोय 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस'​

खेळाडूंचे मानधन किती असतं...

खेळाडूंच्या वार्षिक सरासरी मानधनाबाबत बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना गेल्या वर्षी सर्वाधिक मानधन मिळालेलं आहे. ते एकूण 5.47 दशलक्ष डॉलर इतकं आहे. त्याखालोखाल रॉयल चॅलेंनजर्स बेंगलोरच्या खेळाडूंना मानधन मिळालेलं आहे. ते  एकूण 5.43 दशलक्ष डॉलर इतकं आहे.
जगभरातील सगळ्या प्रसिद्ध खेळांच्या लिग्सचा विचार करायचा झाल्यास एन बी ए अर्थात नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधील खेळाडूंना 2019-20 या वार्षिक वर्षात सर्वात अधिक मानधन मिळालेलं आहे. ते सरासरी 8.32 दशलक्ष डॉलर इतकं आहे. त्याखालोखाल नंबर लागतो तो आपल्या आयपीएलचा... आयपीएलमधील खेळाडूंना या वर्षी सरासरी 5.3 दशलक्ष डॉलर इतके मानधन मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know the economy behind IPL