गडहिंग्लजला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला उद्यापासून (ता. 27) सुरवात होत आहे. महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, गोवा व कर्नाटकातील नामवंत संघांचा या स्पर्धेत सहभाग आहे. स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्ष असून विजेत्यांना दोन लाखांची बक्षिसे आहेत.

गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला उद्यापासून (ता. 27) सुरवात होत आहे. महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू, गोवा व कर्नाटकातील नामवंत संघांचा या स्पर्धेत सहभाग आहे. स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्ष असून विजेत्यांना दोन लाखांची बक्षिसे आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर पाच दिवस ही स्पर्धा होणार असल्याची माहिती युनायटेडचे अध्यक्ष जगदीश पट्टणशेट्टी व उपाध्यक्ष संभाजी शिवारे यांनी दिली. 

सकाळी आठला पहिला सामना होईल; तर उद्‌घाटनाचा सामना दुपारी एकला होणार आहे. केदारी रेडेकर संस्था समूहाच्या अध्यक्षा अंजना रेडेकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होईल. साधना शिक्षण संस्थेचे सचिव जे. बी. बारदेस्कर अध्यक्षस्थानी असतील. हसन मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, उद्योजक अरुण कलाल, विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी, माजी नगराध्यक्ष राजन पेडणेकर, दिनकर सावेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, विश्‍वास देवाळे यांची प्रमुख उपस्थिती आहे. 

पहिल्या दिवशी पात्रता फेरीचे सामने होणार आहेत. दुसऱ्या दिवसापासून मुख्य स्पर्धा बाद पद्धतीने खेळविली जाईल. तिसऱ्या दिवशी उपांत्यपूर्व फेरीचे चार सामने आहेत; तर चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात उपांत्य फेरीचे सामने होतील. शेवटच्या दिवशी दुपारी तीनला अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 51 हजार रुपये रोख व युनायटेड करंडक देऊन गौरविले जाणार आहे. उपविजेत्याला 31 हजार, तिसऱ्या क्रमांकाला 21 हजार, चौथ्या क्रमांकाला 15 हजार रुपयांचे बक्षीस आहे. तसेच शिस्तबद्ध संघ, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक, बचावपटू, मध्यरक्षक, आघाडीपटू, सर्वाधिक गोल नोंदविणारा खेळाडू, स्पर्धावीर अशी वैयक्तिक बक्षिसे आहेत. प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर व लढवय्या खेळाडूचे बक्षीस आहे. 

बंगळूर, केरळची हुकूमत 
बंगळूर व केरळच्या संघांनी सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावत स्पर्धेवर हुकूमत गाजविली आहे. यंदा गोवा व तामिळनाडूच्या कामगिरीविषयी उत्सुकता आहे. पुण्याच्या संघांनीही अलीकडे चौफेर खेळ करून तुल्यबळ संघ म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या बलाढ्य संघाविरुद्ध कोल्हापूर, बेळगाव, मिरज, सोलापूर, पुसद, स्थानिक युनायटेड व मास्टरची कसोटी लागणार आहे. 

Web Title: Kolhapur news National Football competition