केरलाचा युनायटेड करंडकावर कब्जा 

दीपक कुपन्नावर
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

गडहिंग्लज - शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या अंतिम फुटबॉल सामन्यात एफसी केरलाने चेन्नईच्या एजीसीला 3-1 असे हरवून विजेतेपदासह रोख 51 हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा युनायटेड करंडक पटकाविला. पुण्याचा बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रूप तिसरा तर गोव्याच्या सेसा अकादमीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

गडहिंग्लज - शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झालेल्या अंतिम फुटबॉल सामन्यात एफसी केरलाने चेन्नईच्या एजीसीला 3-1 असे हरवून विजेतेपदासह रोख 51 हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा युनायटेड करंडक पटकाविला. पुण्याचा बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रूप तिसरा तर गोव्याच्या सेसा अकादमीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

अंतिम सामन्यात 2 गोल नोंदविणारा केरलाचा श्रेयस स्पर्धावीर ठरला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे एम.आर. हायस्कूलच्या मैदानावर गेले पाच दिवस ही स्पर्धा सुरु होती. अंतिम सामना पहाण्यासाठी दुपार पासूनच हजारो शौकिनांनी एम.आर. हायस्कूलच्या मैदानावर गर्दी केली होती. सायंकाळी चार वाजता अंतिम सामन्याला प्रारंभ झाला. सुरुवातीलाच केरळच्या सुरजित रमेशने गोलक्षेत्राबाहेरुन लगावलेला जोरदार फटका गोल खांबावरुन गेला. या चालीने उत्साह दुणावलेला केरळने शॉर्ट पासिंगद्वारे वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न केला.

21 व्या मिनिटाला चेन्नईच्या प्रविंद्रमने मध्यक्षेत्रातून एका पाठोपाठ चार खेळाडूंना गुंगारा देऊन अफलातून मैदानी गोलची नोंद करीत संघाचे अनपेक्षितपणे खाते उघडले. मध्यंतरापर्यंत हीच आघाडी टिकून राहिली. 
उत्तरार्धात पहिल्याच मिनिटात केरळच्या केलबर शहाजॉन याने दिलेल्या क्रॉस पासवर जतीनने चेंडूला अलगदपणे गोल जाळीत ढकलून सामना 1-1 असा रोमांचक स्थितीत आणला. बरोबरीमुळे केरळचा संघ अधिक आक्रमक तर चेन्नईच्या गोटात सन्नाटा पसरला. त्यामुळेच केरळच्या रहिमची फ्री कीक चेन्नईचा गोलरक्षक सांचीधरण याची परिक्षा घेणारी ठरली.

बगलेतून चढाया करण्याचे धोरण स्विकारुन केरळने चेन्नई संघाला नामोहरम केले. केरळच्या शुभांकरचा पासवर श्रेयसने गोल करुन संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यास केवळ सहा मिनिटे असताना पुन्हा श्रेयसनेच व्हॉलीचा सुंदर वापर करीत आपला दुसरा आणि संघाचा तिसरा गोल संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चेन्नईच्या आघाडीपट्टू रिगन, स्टेजिन यांनी केलेल्या चढाया केरलाच्या बचावपट्टूंनी उधळून लावल्याने याच गोल फरकावर केरला संघाने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडू 
* गोलरक्षक- उबीद (केरला)
* बचावपट्टू - अभिजीत (केरला)
* मध्यरक्षक- माविया (पुणे)
* आघाडीपट्टू - रिगन (चेन्नई)
* प्रतिभावान- बालगंगाधर (बंगळूर)
* स्पर्धावीर- श्रेयस (केरला)

Web Title: Kolhapur news National Football competition