नुरा कुस्तीमुळे मलिक-चिक्काला हाकलले

नुरा कुस्तीमुळे मलिक-चिक्काला हाकलले

कोल्हापूर - ऐतिहासिक राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात ‘नुरा’ कुस्ती करत हिंदकेसरी सुमित मलिक व पंजाब केसरी प्रदीप चिक्का यांनी कुस्तीला काळिमा फासला. ‘‘महाराष्ट्रात कोठेच पाय ठेवू देणार नाही,’’ असा सज्जड दम भरत कुस्तीप्रेमींनी त्यांना मैदानातून हाकलले.

दोघांच्या लढतीतील हाराकिरीने कुस्तीप्रेमींची घोर निराशा झाली असली, तरी ऑलिम्पिकवीर नरसिंग यादव याचा पंजाब केसरी सोनू कुमारने धक्कादायक पराभव करत कुस्तीप्रेमींची मने जिंकली. काटाजोड लढतींनी कुस्तीप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फिटले. 

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले. दुपारी दोन वाजता मैदानास सुरुवात झाली आणि दुपारी चार वाजताच मैदान खचाखच भरले. लहान-मोठ्या गटात चटकदार लढतींना कुस्तीप्रेमींनी दाद दिली. प्रमुख बारा कुस्त्यांतील पहिली लढत सहा वाजून चाळीस मिनिटांनी सुरू झाली. त्यानंतर एकापेक्षा एक सरस लढती पाहण्याचा अनुभव कुस्तीप्रेमींनी घेतला. 

हिंदकेसरी सुमित मलिक विरुद्ध पंजाब केसरी प्रदीप चिक्का यांच्यातील प्रथम क्रमांकाची लढत आठ वाजून ३४ मिनिटांनी सुरू झाली. दहा मिनिटांनंतर सुमित एकेरी पट काढण्यास सरसावला; पण तो प्रयत्न व्यर्थ ठरला. वीस मिनिटांच्या लढतीत हाच एकमेव डाव टाकण्याचा प्रयत्न सुमितकडून झाला. त्यानंतर दोघांनी केवळ खडाखडीवरच भर दिला. त्यामुळे संतापलेल्या निवेदकाने दोघांना बक्षीसच दिले जाणार नाही, असे सांगत काटाजोड लढत करण्याची सूचना केली. नुरा लढत सुरू असल्याचा संशय कुस्तीप्रेमींना आल्याने त्यांनी मैदान सोडायला सुरुवात केली. सव्वीस मिनिटांनंतर मैदानात राष्ट्रकुल विजेता रवींद्र पाटील आला. त्याने दोघांनाही लढत निकाली झालीच पाहिजे, असे सांगत आम्ही पैलवानांचा आदर करतो, पैलवानांची इज्जत घालवू नका, असे सुनावले. त्यानंतर पुन्हा पंच संभाजी वरुटे यांनी मारुती माने, विष्णू सावर्डेकर यांनी निकाली कुस्तीलाच महत्त्व दिल्याचे स्पष्ट केले. रवींद्रने दोघांना महाराष्ट्रात कोठेच कुस्ती लढत लावली जाणार नाही, असा इशारा दिला. चौतीस मिनिटांनंतर लढत गुणांवर लावली जाईल, अशी घोषणा झाली. मात्र कुस्तीप्रेमींनीच त्याला विरोध केला. नऊ वाजून चौदा मिनिटांनी लढत पुन्हा सुरू झाली; पण दोघे डाव टाकण्याच्या तयारीतच नव्हते. त्यामुळे दोघांना पंच वरुटे, कुस्तीप्रेमींनी मैदानाबाहेर हाकलले. 

ऑलिम्पिकवीर नरसिंग यादव व पंजाब केसरी सोनू कुमार दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीसाठी आठ वाजून पंधरा मिनिटांनी एकमेकांना भिडले. नरसिंगने पट काढून सोनूवर ताबा घेतला. सोनूने त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न करताच नरसिंगने आकडी डावावर त्याच्यावर कब्जा घेतला. नरसिंगने मच्छीगोताची पकड घेतली. त्यानंतर त्याने एकलंगी टाकून झोळी मारण्याचा प्रयत्न केला. बगल डूब डावानंतर त्याने एकलंगी डाव टाकला खरा; पण तोच त्याच्या अंगलट आला. सोनूने एकलंगी गदालोट डावावर त्याला चितपट केले. हा निर्णय नरसिंगला मान्य नव्हता. त्याने तशी पंचांकडे तक्रार केली. निकालावर पंच ठाम राहिले. नरसिंग मैदानात काही वेळ घुटमळत राहिला. 

कार्तिकच्या माघारीने कौतुक विजयी घोषित
पिंपळगाव बुद्रुकचा कौतुक डाफळे विरुद्ध कर्नाटक केसरी कार्तिक काटे यांच्यातील लढत महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक अशी असल्याने कुस्तीप्रेमींना लढतीची उत्सुकता होती. सात वाजून तेरा मिनिटांनी ती सुरू झाली. दोघांनी एकमेकांची गर्दन खेचण्याचा प्रयत्न केला. नऊ मिनिटे दोघे एकमेकांचा अंदाज घेत राहिले. दहाव्या मिनिटाला कौतुकने कार्तिकवर कब्जा घेत इराणी एकलंगी बसविण्याचा प्रयत्न केला. कार्तिकने त्याला दाद न देता कौतुकच्या एकलंगीतून सुटका करत त्याच्यावरच ताबा मिळवला आणि कुस्तीप्रेमींच्या काळजाचा ठोका वाढला. पाच मिनिटानंतर कार्तिकने त्याला अस्मान दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून कौतुकने सुटका करून घेतली. मात्र विजयी झाल्याच्या समजुतीत कार्तिक मैदानात प्रेक्षकांना अभिवादन करू लागला. पंचांनी तो विजयी झाला नसल्याचे सांगत पुन्हा लढत लावली. या लढतीत कार्तिकने गुडघेदुखीमुळे लढतीतून माघार घेतली. त्यामुळे कौतुकला विजयी घोषित करण्यात आले. 

संतोषची डंकी; शिवाया चितपट..
कर्नाटकचा शिवाया पुजारी विरुद्ध मोतीबाग तालमीचा संतोष लवटे यांच्यात सहा वाजून चाळीस मिनिटांनी लढतीस सुरवात झाली. चार मिनिटे दोन्ही मल्लांनी एकमेकांचा अंदाज घेण्यात दवडली. त्यानंतर संतोषने शिवायाचा कब्जा घेतला. त्यातून सुटल्यानंतर शिवायाने संतोषला खाली खेचण्याचा प्रयत्न केला. अखेर संतोषने डंकी डावावर एकविसाव्या मिनिटाला शिवायाला अस्मान दाखवले.

सचिनची विवेकवर गुणांनी मात..
मोतीबागचा सचिन जामदारने सतपाल आखाड्याच्या विवेक कुमारला जमिनीवर खाली खेचले. विवेकने त्याच्या पकडीतून सहीसलामत सुटताच प्रेक्षकांतून शिट्यांचा आवाज घुमला. याच वेळी मैदानातून ‘बजरंग बली की जय’चा नारा दुमदुमला; पण त्यानंतर ही लढत संथ झाली. त्यामुळे वीस मिनिटांनंतर ही लढत गुणांवर घोषित झाली. तरीही या कुस्तीत रंग काही भरला नाही. अखेर सचिनने विवेकवर ताबा घेत गुणांची कमाई केली आणि विजयी झाला.

अनुप समीरकडून गुणावर पराभूत
गारगोटीचा समीर देसाई विरुद्ध पंजाबचा अनुप कुमार यांच्यात सात वाजून पाच मिनिटांनी लढतीला प्रारंभ झाला. पंधरा मिनिटे लढत रेंगाळली. दोघांकडून अपेक्षित लढत झाली नाही. अखेर पंचांनी ही लढत गुणांवर लावली. समीरने अनुपवर गुण वसूल करत विजय मिळवला. 

देवीदास विजयविरुद्ध गुणावर विजयी..
सोलापूरचा देवीदास घोडके व मोतीबागचा विजय पाटील यांनी सात वाजून दहा मिनिटांनी एकमेकांना सलामी दिली आणि लढत सुरू झाली. विजयने पुटी लावण्याचा केलेला प्रयत्न देवीदासने व्यर्थ ठरवला. विसाव्या मिनिटाला विजयने एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फोल ठरवत देवीदासने कब्जा घेत गुणावर तो विजयी झाला. 

संतोषचा अफलातून घिस्सा डावावर जय 
शाहूपुरीचा संतोष दोरवड विरुद्ध मामासाहेब मोहोळ आखाड्याचा साईनाथ रानवडे यांच्यातील लढत सात वाजून बावीस मिनिटांनी सुरवात झाली. या लढतीत संतोषने साईनाथचा ताबा घेतला. त्याने लवंदर घिस्सा मारत साईनाथला अस्मान दाखवले. 

नंदू आबदारचा चौथ्याच मिनिटाला पराभव
उपमहाराष्ट्रकेसरी नंदू आबदार हा आंतरराष्ट्रीय विजेता गणेश जगतापविरुद्ध कसा खेळणार याची उत्सुकता होती. नंदूने गणेशवर ताबा मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. त्याला खाली खेचण्याच्या प्रयत्नात गणेशनेच चौथ्या मिनिटाला दुहेरी पटावर नंदूला चितपट केले. 

परवीणचा विजयला दे धक्का...
भारतकेसरी परवीण भोला विरुद्ध मोतीबागचा विजय धुमाळ यांच्यात सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी लढत सुरू झाली. लढतीत विजयने परवीण भोलावर ताबा मिळवला. त्यातून विजयने सुटका केल्यानंतर परवीणने पुन्हा त्याला खाली खेचत मानेवर घुटणा ठेवला. परवीणने हात काढून घिस्सा (सिंगल नेल्सन) डावावर विजयला अस्मान दाखवले. 

अतुलची योगेशविरुद्ध गुणावर बाजी...
महान भारत केसरी योगेश बोंबाळे विरुद्ध परभणी केसरी अतुल पाटील यांच्यात बराच उशीर लढत सुरू होती. दोघे एकमेकांवर डाव टाकत होते. ही लढत गुणांवर घोषित झाली. ती अतुलने गुणावर जिंकली. 

माऊली नागपट्टीवर विजयी  
शाहू विजयी गंगावेसचा माऊली जमदाडे विरुद्ध बाला रफिकने सावध सुरवात केली. बाला रफिकने दुहेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. तो फसल्यानंतर छडी टांग लावण्यासाठी तो सरसावला, मात्र ही लढत माऊलीने नागपट्टीवर जिंकली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com