कबड्डीत भारताला कोरियाचा धक्का 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

जाकार्ता : आशियाई कबड्डी स्पर्धेतील भारताच्या निर्विवाद वर्चस्वाला सोमवारी कोरियाने तडा दिला. पुरुष विभागात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात कोरियाने भारताचा 24-23 असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. या पराभवामुळे भारताची आशियाई स्पर्धेतील सलग 32 विजयांची मालिका खंडित झाली. 

जाकार्ता : आशियाई कबड्डी स्पर्धेतील भारताच्या निर्विवाद वर्चस्वाला सोमवारी कोरियाने तडा दिला. पुरुष विभागात अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात कोरियाने भारताचा 24-23 असा अवघ्या एका गुणाने पराभव केला. या पराभवामुळे भारताची आशियाई स्पर्धेतील सलग 32 विजयांची मालिका खंडित झाली. 

कबड्डी म्हणजे भारताची मक्तेदारी मानली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वी भारताला एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. 2016 मध्ये झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताचा कोरियानेच पराभव केला होता. आशियाई स्पर्धेत 1990मध्ये या खेळाचा समावेश झाल्यापासून सुवर्णपदक भारताच्याच नावावर आहे. या वेळी मात्र भारतासमोर कोरियाने आव्हान उभे केले. प्रदीप नरवाल, अजय ठाकूर, मनू गोयत असे स्टार चढाईपटू असतानाही कोरियाच्या भक्कम बचावापुढे त्यांची डाळ शिजली नाही. संपूर्ण सामन्यात भारताला आघाडी घेण्यात अपयश आले आणि हेच त्यांच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. उत्तरार्धात एकदाच मिळविलेली बरोबरी भारतासाठी समाधानाची बाब ठरली. एरवी भारतीयांना कोरियाचा पाठलाग करणे जमलेच नाही. त्यांच्या भक्कम बचावाला जान कुन लीच्या चढाईंची सुरेख साथ मिळाली. 

महिलांना थायलंडने झुंजवले 
भारताच्या महिलांनी सकाळी थायलंडचा 33-23 असा 10 गुणांनी पराभव केला असला, तरी थायलंडने त्यांच्या बचावातील उणिवा उघड केल्या हे विसरता येणार नाही. सुरवातीला एखाद दुसऱ्या गुणाची आघाडी मिळविणाऱ्या भारताला थायलंडच्या मुलींनी मध्यंतराला 11-11 असे बरोबरीत रोखले होते. पण, उत्तरार्धात रणबीर कौर हिच्या ताकदवान चढायांमुळेच भारताला आपला गुणफलक झटपट वाढवता आला. तिच्या तीन "सुपर रेड' सामन्याचा निर्णय स्पष्ट करणाऱ्या ठरल्या. पण, बचावात भारतीय महिलांनी केलेल्या क्षुल्लक चुका विसरता येणार नाहीत. 

Web Title: Korea defeats India in kabaddi