मलेशियावरील विजयाने भारतीय मुली गटात अव्वल

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

बॅंकॉक - भारतीय मुलींनी 18 वर्षांखालील कुमार आशिया करंडक हॉकी स्पर्धेत साखळीतील अखेरचा तिसरा सामना जिंकून गटात अव्वल स्थान पटकावले. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 असा पराभव केला.

बॅंकॉक - भारतीय मुलींनी 18 वर्षांखालील कुमार आशिया करंडक हॉकी स्पर्धेत साखळीतील अखेरचा तिसरा सामना जिंकून गटात अव्वल स्थान पटकावले. मंगळवारी झालेल्या सामन्यात त्यांनी मलेशियाचा 3-1 असा पराभव केला.

संथ झालेल्या सुरवातीनंतर भारतीय मुलींनी वेगवान खेळायला सुरवात करून सामन्यावर नियंत्रण मिळविले. वेगाला आक्रमकतेची जोड देऊन त्यांनी अनेकदा मलेशियाचा बचाव भेदला. मात्र, गोल करण्यात त्यांना अपयश आले. मलेशियानेदेखील प्रतिआक्रमण करत पेनल्टी कॉर्नर मिळविला होता. भारताच्या भक्कम बचावामुळे तो व्यर्थ ठरला. भारताने मात्र मिळालेला पहिला पेनल्टी कॉर्नर सार्थकी लावला. मनप्रीत कौर हिने गोल करून भारताचे खाते उघडले.

भारताने याच एकमात्र गोलवर विश्रांतीला आघाडी घेतली. दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंच्या आक्रमणाला अधिक धार आली. सामन्याच्या 39व्या मिनिटाला मिळालेला दुसरा पेनल्टी कॉर्नरही भारताने सार्थकी लावला. या वेळी पहिला प्रयत्न अपयशी ठरला. पण, दुसऱ्या प्रयत्नात पूनमचा फटका मलेशियन बचावफळी रोखू शकली नाही. अर्थात लगोलग पुढच्याच मिनिटाला नूरामिराह शहकिराड हिने मलेशियाचा एकमात्र गोल केला. अखेरच्या टप्प्यात भारतीय मुलींमधील समन्वयाचा उत्तम नमुना बघायला मिळाला. मनप्रीतने जोरदार मुसंडी मारल्यावर संगीता कुमारीकडे चेंडू दिला. तिने मलेशियाच्या बचावफळीला चुकवून लालरेसियामी हिच्याकडे पास दिला आणि तिने ही संधी साधत जाळीचा अचूक वेध घेत भारताची आघाडी भक्कम केली. त्यानंतर बचावावर भर देत त्यांनी मलेशियाला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही.

Web Title: Kumar Asia Hockey Women