World Cup 2019 : अष्टपैलूंचा भरणा हीच भारताची खरी ताकद

Team_India
Team_India

वर्ल्ड कप 2019 : मुंबई : आगामी विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी दहा संघांतील गोलंदाजीची क्षमता लक्षात घेतल्यास भारताची गोलंदाजी सर्वोत्तम दिसून येते, असे मत भारताचा माजी सलामीचा फलंदाज लालचंद राजपूत यांनी व्यक्त केले. 

विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघाबाबत बोलताना राजपूत म्हणाले, "भारताची गोलंदाजी निश्‍चितच सर्वोत्तम आहे. त्याचबरोबर निवडण्यात आलेला संघदेखील सर्वांत समतोल दिसून येतो. चांगले अष्टपैलू या संघात आहेत. सलामी, मधली फळी, अष्टपैलू, गोलंदाजी अशा आघाड्यांवर अन्य संघांचा अभ्यास केल्यास भारतीय संघ एक पाऊल पुढे वाटतो.'' 

भारतीय संघाविषयी अधिक बोलताना राजपूत म्हणाले, "प्रत्येक सामन्याचा दिवस महत्त्वाचा असतो. भारतासाठी दिवस चांगला असेल, तर त्यांना हरविणे कठीण असेल. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा हे दोन खेळाडू भारतासाठी निर्णायक ठरू शकतात. एकूणच आपल्याला विजेतेपदाची चांगली संधी आहे.'' 

भारताने पहिल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळविले, तेव्हा राजपूत भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. सध्या ते झिंबाब्वे संघाचे प्रशिक्षक आहेत. भारताच्या 2007 मधील विजेत्या आणि या वेळी खेळणाऱ्या संघातील साम्य विचारले असता, राजपूत म्हणाले, "आधी म्हटल्याप्रमाणे भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंचा वाटा महत्त्वाचा ठरतो. या आघाडीवर आपला संघ सर्वोत्तम आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आपले पहिले तीन फलंदाज शिखर धवन, रोहित मिश्रा, कर्णधार विराट कोहली हे कमालीच्या फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांच्यावर बरेच काही अवलंबून असेल. या दोन स्पर्धेच्या संघाची तुलना करायची झाल्यास अष्टपैलू खेळाडूंच्या आघाडीवरच होऊ शकते.'' 

राजपूत यांचा समतोल संघ 
भारताच्या 2007 मधील विजेत्या आणि सध्याच्या संघातील साम्य म्हणजे त्यांची आघाडीची फलंदाजीची फळी. आधीच्या संघात वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर होते. आता रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली आहेत. त्यांच्यानंतर हार्दिक पंड्या, महेंद्रसिंह धोनी खेळू शकतात. त्यानंतर गोलंदाजीची ताकद. अशा पद्धतीने भारताचा संघ समतोल दिसून येतो, असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com