मुंबई मॅरेथॉनपासून ललिता, कविता दूर? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - ललिता बाबर व कविता राऊत या मुंबई मॅरेथॉनमधील अव्वल भारतीय यंदा या स्पर्धेपासून दूर राहणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर गतविजेता जितेंद्रसिंग रावत व गोपी हेही यंदाच्या स्पर्धेत नसतील, असेही समजते. 

मुंबई - ललिता बाबर व कविता राऊत या मुंबई मॅरेथॉनमधील अव्वल भारतीय यंदा या स्पर्धेपासून दूर राहणार असल्याचेच संकेत मिळत आहेत. त्याचबरोबर गतविजेता जितेंद्रसिंग रावत व गोपी हेही यंदाच्या स्पर्धेत नसतील, असेही समजते. 

ललिताची सध्या बीएची अखेरच्या वर्षाची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे ती या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. सध्या तिने अभ्यासावरच लक्ष केंद्रित केले आहे. एवढेच नव्हे, तर तिला रविवारी बंगळूरला जायचे आहे. ती साताऱ्याहून पुणेमार्गे बंगळूरला जाईल, असेही सांगण्यात आले. कविताने मुंबई मॅरेथॉनऐवजी फेब्रुवारीत होणाऱ्या राष्ट्रीय मॅरेथॉनला पसंती देण्याचे ठरवले आहे. मुंबईत सहभागी झाल्यास राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पूर्ण रिकव्हर होता येणार नाही. त्याचा परिणाम त्या स्पर्धेतील कामगिरीवर होईल, असा विचार कविताने केला असल्याचे सांगितले जात आहे. गतविजेता जितेंद्रसिंग हा रिओ ऑलिंपिकनंतर जखमी झाला होता. तो अद्याप पूर्ण तंदुरुस्त नाही, तर गतवर्षी मुंबई मॅरेथॉनद्वारेच ऑलिंपिक पात्रता मिळवलेला गोपी हा राष्ट्रीय रोड रेड स्पर्धेत सहभागी होईल. मुंबई मॅरेथॉन येत्या रविवारी आहे. त्याच दिवशी ही स्पर्धाही होणार आहे. अर्धमॅरेथॉनमध्ये या स्पर्धेतील अनेक स्पर्धक सहभागी होतात आणि त्याचा परिणाम काही प्रमाणात दोन्ही स्पर्धांवर होईल, असे भारतीय ऍथलेटिक्‍स पदाधिकारीही मान्य करतात. काही पदाधिकारी सध्या आंतरविद्यापीठ स्पर्धाही सुरू असल्याचीही आठवण करून देतात.

Web Title: Lalita babar & kavita raut no participate Mumbai Marathon