लिव्हरपूलचा आठवा विजय; 8 गुणांची आघाडी

वृत्तसंस्था
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

जेम्स मिल्नरने भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये लिस्टरचा पराभव केला; मात्र त्याच वेळी गतमोसमात चॅम्पियन्स लीगचे उपविजेते टॉटनहॅम ब्रायनविरुद्ध पराजित झाले.

लंडन : जेम्स मिल्नरने भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे लिव्हरपूलने प्रीमियर लीग फुटबॉलमध्ये लिस्टरचा पराभव केला; मात्र त्याच वेळी गतमोसमात चॅम्पियन्स लीगचे उपविजेते टॉटनहॅम ब्रायनविरुद्ध पराजित झाले.

लिव्हरपूलने प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमातील सलग आठवा; तर एकंदरीत लीगमधील सलग सतरावा विजय मिळवला. सादिओ मेनच्या लीगमधील शंभराव्या गोलने लिव्हरपूलचे खाते उघडले. 80 व्या मिनिटास लीस्टरने बरोबरी साधली, त्या वेळी लिव्हरपूलची विजयी मालिका खंडित होणार असे वाटले होते, पण पहिल्या गोलच्या वेळी निर्णायक पास देणाऱ्या मिल्नरने भरपाई वेळेत संघाला विजयी केले. लिव्हरपलूने दुसऱ्या क्रमांकावरील मॅंचेस्टर सिटीला तब्बल आठ गुणांनी मागे टाकले आहे.

टॉटनहॅमला या मोसमात सूरच गवसलेला नाही. त्यांचा गोलरक्षक ह्युगो लायन्स सामन्याच्या सुरुवातीसच जखमी झाला. त्यातून सावरण्यापूर्वीचे ते ब्रायनविरुद्ध 0-3 पराजित झाले होते. टॉटनहॅमचे अनेक खेळाडू दुसऱ्या संघांबरोबर चर्चा करीत आहेत, त्यामुळे त्यांचे खेळावर लक्ष नसल्याची टीका सुरू झाली आहे. त्यांनी या मोसमात 11 पैकी तीनच लढती जिंकल्या आहेत.

रेयाल माद्रिदचा विजय
माद्रिद ः रेयाल माद्रिदने ला लिगामध्ये ग्रॅनाडाचे कडवे आव्हान 4-2 असे परतवले. या मोसमात ग्रॅनाडाने लक्षणीय प्रगती केल्यामुळे रेयालसाठी हा विजय मोलाचा आहे. दरम्यान, गेरार्थ बेल आणि टोनी क्रूस जखमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय लढतीपूर्वी जर्मनी आणि वेल्सची चिंता वाढली आहे.

पीएसजीचे अग्रस्थान कायम
पॅरिस ः पीएसजीने लीग वनमध्ये अँगर्सचा 4-0 असा फडशा पाडत अग्रस्थान कायम राखले. नेमारने गोल करीत पुन्हा चाहत्यांना जिंकण्याचा प्रयत्न केला. पीएसजीला यापूर्वीच्या होम लढतीत हार पत्करावी लागली होती, त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय मोलाचा आहे. नॅंतेसने नाईसला 1-0 हरवून दुसरा क्रमांक मिळवला.

बायर्न म्युनिचची धक्कादायक हार
म्युनिच ः बायर्न म्युनिचला मोसमातील पहिल्या पराभवास सामोरे जावे लागले. घरच्या मैदानावरील लढतीत ते हॉफेहेमविरुद्ध 1-2 पराजित झाले. काही दिवसांपूर्वीय बायर्नने टॉटनहॅमचा 7-2 धुव्वा उडवला होता. बायर्न अजूनही साखळीत अव्वल असले, तरी हे गोलफरकामुळेच आहे. कोणताही संघ कमकुवत नसतो हा धडाच आम्हाला या पराभवाने दिला असल्याची भावना बायर्नचा कर्णधार मॅन्यूएल नेऊर याने व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: liverpool's 8 th win, lead by 8 points