महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे पर्यायी इमेल अकाऊंट हॅक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 July 2019

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) पर्यायी इमेल अकाऊंट मंगळवारी हॅक झाले.

पुणे - महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) पर्यायी इमेल अकाऊंट मंगळवारी हॅक झाले. बीसीसीआयसह स्थानिक पत्रकारांना सुद्धा यातून मेल गेल्या. त्याद्वारे लेखापाल एन. जी. चाफेकर यांच्या नावाने मेल आली. तुम्ही मला मदत करु शकता का, कृपया उत्तर द्या, अशी पहिली मेल होती. त्यास ज्यांनी प्रतिसाद दिला, त्यांना पुढच्या क्षणी दुसरी मेल आली. त्यात म्हटले होते की, आपली पुतणी ल्युकेमिया या दुर्धर विकाराने अत्यवस्थ आहे. आपण परदेशात आहोत. तातडीने उपचारांची गरज आहे. त्यासाठी एक लाख 20 हजार रुपये लागतील. तरी दीड लाख रुपये ऑनलाईन भरावेत. त्यास ज्यांनी रिप्लाय दिला त्यांना बँक खात्याचा तपशील कळविण्यात आला. 

दरम्यान, एमसीएचे चिटणीस रियाझ बागवान यांनी सांगितले की,  cricketmaharashtra@yahoo.com हा आमचा नेहमीचा इ-मेल आयडी आहे.  cricketmaharashtra@outlook.com ह पर्यायी आयडी आहे. याच अकाऊंटमधून मेल आल्याचे सकाळी बऱ्याच जणांनी दूरध्वनीवरून कळविले. त्यानंतर आम्ही सायबर गुन्हे शाखेत धाव घेतली. त्यावेळी पहाटे तीन वाजता नायजेरियामधून हॅकींगचे प्रयत्न सुरु झाले. त्यानंतर सकाळी ते यशस्वी झाले. आम्ही तातडीने बीसीसीआयसह सर्व संबंधितांना कळविले. सुदैवाने हे संघटनेचे अधिकृत इ-मेल अकाऊंट नाही. सायबर तज्ञांनी सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन आम्ही करीत आहोत. पासवर्ड बदलण्यात आला आहे. इतरही खबरदारी घेत आहोत.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यातून कुणाला आर्थिक फटका बसलेला नाही, पण एमसीएचे पर्यायी इमेल अकाऊंट हॅक होणे हा चर्चेचा विषय ठरला. याचे कारण तमाम काँटॅक्टना अशा मेल गेल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Cricket Association alternative email account hacked