विजय-अभिजित किताबाची लढत (महाराष्ट्र केसरी)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

चौधरीला हॅटट्रिक, तर कटकेला पहिल्या विजेतेपदाची संधी

चौधरीला हॅटट्रिक, तर कटकेला पहिल्या विजेतेपदाची संधी

पुणे : "डबल महाराष्ट्र' केसरी विजय चौधरीने अपेक्षित कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा "महाराष्ट्र केसरी' किताबाची लढत खेळण्याची किमया साधली. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या 60व्या अधिवेशनात आता त्याला किताबाची "हॅटट्रिक' साधण्याची संधी असेल.
किताबाच्या लढतीत उद्या त्याला पुणे शहराच्या अभिजित कटके याचे आव्हान असेल. कटके उद्या प्रथमच किताबाची लढत खेळणार आहे. त्यामुळे "महाराष्ट्र केसरी' किताबाच्या लढतीत उद्या वारजे येथील कै. रमेश वांजळे कुस्ती आखाड्यात दोन्ही पैकी एकाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी आज पुणेकरांना निराश करणाऱ्या लातूरच्या सागर बिराजदारची आगेकूच गादी विभागातील अंतिम लढतीत पुण्याच्या अभिजित कटके याने रोखली. अभिजित पुण्याचा आणि प्रतिस्पर्धी सागर लातूरचा असला तरी त्याची घडण सगळी पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत झालेली. त्यामुळे तुडुंब भरलेल्या मैदानात चाहत्यांकडून दोघांनाही सारखेच प्रोत्साहन मिळत होते. पहिल्याच फेरीत अभिजितने एकेरी पट काढत दोन गुण मिळविले. त्या वेळी खाली पडताना सागरच्या खांद्याला दुखापत झाली; पण तातडीचे उपचार घेऊन सागर पुन्हा जिद्दीने मैदानात उतरला. अर्थात, सलग कुस्ती झाल्याने दमछाक झालेल्या सागरच्या कुस्तीत जोर नव्हता. आघाडी घेतल्यामुळे अभिजितनेही फारसे प्रयत्न केले नाहीत. पहिल्या फेरीत 2-0 अशी आघाडी मिळविल्यावर अखेरच्या फेरीत त्याने नकारात्मक कुस्तीच अधिक केली. वारंवार सूचना दिल्यानंतर अखेर पंचांनी त्याला गुणाचा दंड केला. या एकमात्र गुणाचेच समाधान सागरला लाभले.

त्यापूर्वी, माती विभागातील अंतिम फेरीत विजय चौधरीने थकलेल्या देहबोलीतही जालन्याच्या विलास डोईफोडेचे आव्हान एकतर्फी लढतीत सहज मोडून काढले. पहिल्या लढतीपासून विजयचा खेळ हा आपल्याला जोड नाही हेच दाखवून देणारा होता. नागपूर येथे दुसऱ्यांदा जिंकल्यानंतर पायाच्या दुखापतीमुळे त्याने वर्षभर फारशा लढती न करता सराव आणि मेहनतीवर भर दिला. उपांत्य फेरीत पिछाडीवर असूनही निर्णायक क्षणी लातूरच्या ज्ञानेश्‍वर गोचडेचा लपेट डाव त्याच्यावर उलटवून कुस्ती चीतपट जिंकणाऱ्या विलासकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. प्रत्यक्षात तो विजयला प्रतिकारही करू शकला नाही. भारंदाज डावाची कमाल दाखवत विजयने चार गुणांची कमाई केली आणि त्यानंतर एकेरी पटाने ताबा मिळवत एकेक गुणांची कमाई करून विजयने लढत गुणांवर 7-0 अशी सहज जिंकली.

त्यापूर्वी, उपांत्य फेरीत गादी विभागात सागरने मुंबई पश्‍चिमच्या गणेश जगताप आणि अभिजितने मुंबईच्याच समाधान पाटीलचे आव्हान संपुष्टात आणले. माती विभागात विजय चौधरीने सांगलीच्या मारुती जाधव याचा गुणांवर पराभव केला.

Web Title: Maharashtra kesari vijayand abhijeet