Maharashtra Kho-Kho Gold MedalSakal
क्रीडा
38th National Games: खो-खो खेळात महाराष्ट्रचा दुहेरी धमाका! महिला व पुरूष संघांनी सुवर्णपदक राखले
38th National Games Maharashtra Kho-Kho Gold Medal: ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो खो संघांनी सुवर्णपदके जिंकून दुहेरी धमाका केला.
गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो खो संघांनी आपल्या लौकिकास जागत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदके जिंकून दुहेरी धमाका केला.
चुरशीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या महिलांनी ओडिशाचा ३१-२८ असा ३ गुणांनी पराभव करीत जेतेपद राखले. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने मात्र, सव्वा सात मिनिटे राखून व ६ गुणांनी (३२-२६) असा पाडाव करीत रुबाबात पुन्हा एकदा सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली.
इंदिरा गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला ओडिशाने कडवी लढत दिली. तिसऱ्या टर्नमध्ये संरक्षण करताना एका मिनिटात महाराष्ट्राचे तीन खेळाडू बाद झाल्याने धाकधूक वाढली होती. त्यातच गौरी शिंदे पळतीच्या वेळी पाय मुरगळून जायबंदी झाल्याने ओडिशाचा हुरूप वाढला होता.

