कोरोनाला पळवायचय मग 'ते' नक्की करा; वाचा कोणी दिलाय नेमका कोणता सल्ला

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 23 June 2020

शारीरिक कसरतींना जीवनाचा अविभाज्य भाग बनवा आणि वाढलेल्या प्रतिकारशक्तीने कोरोनासारख्या विषाणूला पळवा, असा सल्ला सिंधूने दिला आहे. 

नवी दिल्ली ः कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी लशीची प्रत्येक जण चाकताप्रमाणे वाट पाहत असताना भारताची फुलराणी पी. व्ही. सिंधूने उपाय सुचवला आहे. शारीरिक कसरतींना जीवनाचा अविभाज्य भाग बनवा आणि वाढलेल्या प्रतिकारशक्तीने कोरोनासारख्या विषाणूला पळवा, असा सल्ला सिंधूने दिला आहे. 

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

सहा महिन्यांहून अधिक काळ झालेल्या कोरोना या विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. आत्तापर्यंत 8 कोटी लोक बाधित झाले असून 4 लाख 50 हजारांहून अधिकांचा मृत्यू झालेला आहे. खेळ किंवा इतर कोणत्याही शारीरिक कसरती या प्रतिकारशक्ती ताकदवर बनवण्यात महत्त्वाच्या आहेत. या महामारीवर आतापर्यंत कोणतीही लस मिळालेली नसताना व्यायामाचाच सक्षम पर्याय असल्याचे सिंधूने सांगितले. हेल्थकेअर आणि हायजिन एक्‍पो 2020 या उपक्रमाच्या व्हर्च्युअल उद्घाटनप्रसंगी सिंधू बोलत होती. 

टेनिसमध्ये चिंता! `या` खेळाडूला कोरोना; आता जोकोविचचे काय होणार? 

कोरोनाचे रुग्ण भारतातही वाढत असून आत्तापर्यंत ही संख्या 4 लाखांच्या घरात गेलेली आहे; तर 13 हजार 700 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या तरी खुल्या मैदानावर सराव आणि खेळ करण्यावर निर्बंध असले, तरी शारीरिक कसरती मात्र सहजतेने घरीही करू शकतो, असे सिंधूचे म्हणणे आहे. 
आठवड्यातून किमान 300 मिनिटे जर ऍरोबिक कसरती केल्या, तर हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, उदासीनता यांसारख्या आजाराचा सामना करता येऊ शकतो, या जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाने जर स्वतःसाठी थोडा वेळ दिला, तर कोरोनासारख्या महामारीचाही आपण मुकाबला करू शकतो, असे सिंधूने सांगितले. 

अवघी 45 मिनिटे वेळ द्या 
स्वतःमध्ये काही तरी नवा बदल करण्याची हीच योग्य वेळ आहे. प्रत्येकाने कोणता कोणता व्यायाम प्रकार करायला पाहिजे, एक खेळाडू म्हणून मी सांगू शकते. 45 मिनिटांचा व्यायामही शरीराची ताकद वाढवण्यास पुरेसा ठरू शकतो, असे सिंधू म्हणते. 

सिंधूसह देशातील सर्व प्रमुख खेळाडू तीन महिन्यांपासून घरातच आहेत. देशातील काही भागात खेळाडूंनी सराव सुरू केलेला आहे; परंतु तेलंगणा सरकारने अजून लॉकडाऊन रद्द केलेले नसल्यामुळे सिंधूही कोर्टवरील सरावाची वाट पाहत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Make physical exercise an integral part of life and fight off corona-like viruses with increased immunity, Sindhu advises.