राष्ट्रीय स्तरावर पोचली मल्लखांबाची दोरी 

विशाल पाटील
बुधवार, 2 जानेवारी 2019

साताऱ्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावरील कारी हे गाव तसे प्रसिद्धीपासून कोसो दूर. पण, गेल्या काही वर्षांत समर्थ रामदासांच्या सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या या डोंगरदऱ्यातील गावाने मल्लखांबपटूंच्या कसरतींनी राष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करून आपली वेगळी छाप उमटवली आहे. एक, दोन, तीन नव्हे, तर तब्बल १२ राष्ट्रीय खेळाडू, तर ३५ हून अधिक राज्यस्तरावर चमकणारे खेळाडू या गावाने तयार केले आहेत. त्याचे श्रेय जाते, ते शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त, शिक्षिका माया मोहिते यांना. आज या गावकऱ्यांना आपल्या गावाविषयी सार्थ अभिमान वाटतो.

जिल्हा परिषदेची कारी येथील शाळा पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच राष्ट्रीय मल्लखांबपटू घडविणारी शाळा ठरली आहे. या गावातील अंगणवाडीपासूनच येथे छोट्या छोट्या मुलींना दोरीवरील मल्लखांब कलेत तरबेज केले जाते. मल्लखांबपटूंची ‘शाळा’ ठरणाऱ्या कारी गावातील मुली दरवर्षी राज्य, राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. सध्या या शाळेचा पट १२५ असून, त्यापैकी तब्बल ४५ मुली मल्लखांब शिकत आहेत. १९९९ पूर्वी ही शाळा जिल्हा परिषदेच्या इतर शाळांप्रमाणेच होती. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या माया मोहिते येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाल्या अन्‌ शाळेत शौर्याचा कित्ता गिरवला जाऊ लागला. शाळेच्या पटांगणात मोठा पार (दगडाचा चौथरा) आणि त्याला लागून असलेले जुने मोठे वडाचे झाड हेच त्यांचे ‘स्टेडियम’ बनले. त्या झाडाच्या फांदीला दोर बांधून मुलींचा सराव सुरू झाला. लवचिकता, गती, प्रसरणशीलता, धाडस, ताकद या बळावर मुलींनी यशाची शिखरे गाठली. 

आभाळागत ‘माया’...
कारी हे गाव मल्लखांबात खेळाडू घडविणारे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच्या खऱ्या सूत्रधार आहेत शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त माया मोहिते. प्राथमिक शिक्षिका म्हणून कारीत रुजू झाल्यानंतर गावातील मुलींना खेळाचा लळा लावला. आज ४५ मुली या खेळाचा सराव करत आहेत. प्रारंभी मुलींना खेळाच्या ‘ड्रेस कोड’वरून विरोध झाला. मात्र, मोहिते यांनी महिलांचे मतपरिवर्तन केले. आता त्याच महिलांना मुलींचा अन्‌ माया यांचाही अभिमान वाटतो. व्यायामशाळेतील मुलींचा उल्लेख ‘माझ्या मुली’ करतात. यातून त्यांची मुली, खेळाविषयीची माया दिसते.

राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व...
आश्‍विनी किर्दत, प्रियंका मोरे, तेजस्विनी मोरे, वर्षा मोरे, पूजा चव्हाण, प्रतीक्षा मोरे, संध्या मोरे, प्राजक्‍ता मोरे, पूजा मोरे, वैभवी मोरे, भक्‍ती मोरे, मयूरी मोरे. भक्‍तीने राष्ट्रीय स्तरावर वैयक्‍तिक व सांघिक, तर मयूरीने सांघिक सुवर्णपदक मिळविले आहे.

‘१९९९ मध्ये शाळेत रुजू झाल्यानंतर मल्लखांब संघाची स्थापना केली. प्रारंभी १५ मुली मल्लखांब खेळण्यास पुढे आल्या. सध्या ४५ मुली व्यायामशाळेत खेळ शिकतात. आजवर १५० हून अधिक मुलींनी मल्लखांब शिकले आहे. विशाखा देशमुख या मुलीने रांजणगावहून येथे मल्लखांब शिकण्यासाठी प्रवेश घेतला आहे.’’
- माया मोहिते, शिक्षिका

Web Title: Mallakhamba at the national level