esakal | खेळाडू ते टोकिओ ऑलिंपिक पंच, वाचा नागपूरकर मंगेश मोपकर यांचा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

mangesh mopkar

खेळाडू ते टोकिओ ऑलिंपिक पंच, वाचा नागपूरकर मंगेश मोपकर यांचा प्रवास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या तीन दशकांत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (international competition) पंचांची भूमिका बजावत असतानाच जागतिक स्पर्धा किंवा प्रतिष्ठेच्या ऑलिंपिकमध्ये सहभागी होण्याचे माझे स्वप्न होते. ते स्वप्न टोकियो ऑलिंपिकच्या (Tokyo Olympics) निमित्ताने यावेळी पूर्ण होत आहे. माझ्यासाठी ही फार मोठी उपलब्धी असून, आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय व आनंदाचा क्षण असल्याची भावना मंगेश मोपकर (umpire mangesh mopkar) यांनी बोलून दाखविली. (mangesh mopkar selected as umpire in tokyo olympics)

हेही वाचा: Olympics 2020 : आखाड्यातील ढाण्या वाघाकडून गोल्डन कामगिरीची आस

येत्या २३ जुलैपासून जपानमध्ये सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिंपिकसाठी मोपकर यांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत पंच म्हणून निवड झालेले ते भारताचे एकमेव, तर रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या श्रीधरनंतर दुसरे भारतीय टेबलटेनिस पंच आहेत. मोपकर म्हणाले, मी आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. मात्र, ऑलिम्पिकमध्ये कधीच संधी मिळाली नव्हती. सुदैवाने यावेळी ती संधी चालून आली आहे. आयुष्यात एकदाच अशी संधी मिळते. त्यामुळे माझ्यासाठी हा आनंद व अभिमानाचा क्षण आहे. ऑलिंपिकसारख्या मोठ्या स्पर्धेत पंचांची भूमिका बजावताना किती दडपण राहील, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले. मी सात-आठ देशांमध्ये पंचगिरी केलेली आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव नवीन नाही. उल्लेखनीय म्हणजे या स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये एकही प्रेक्षक राहणार नाहीत. त्यामुळेही दडपण कमी होणार आहे.

आठ देशांमध्ये पंचगिरीचा मान -

बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापक पदावरून दोन वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती पत्करणारे ६० वर्षीय मोपकर गेल्या ३० ते ४० वर्षांपासून खेळाडू आणि पंच म्हणून टेबलटेनिसमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत भारत, चीन, हाँगकाँग, इंग्लंड, कोरिया, तायवान, जपान, इंडोनेशिया या देशांमध्ये झालेल्या विविध स्पर्धांमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. त्यांचे वडील अविनाश मोपकर आणि भाऊ राजेश मोपकर हेसुद्धा आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक आहेत.

महिनाभरापासून धावपळ -

ऑलिंपिकच्या तयारीसाठी मोपकर गेल्या एक महिन्यांपासून सतत धावपळ करीत आहेत. ऑलिंपिकचे कडक नियम आणि सध्या कोरोनाचा काळ असल्यामुळे औपचारिकता पूर्ण करताना त्यांना खूप त्रास झाला आहे. त्यातच तिकीट काढलेले विमान अचानक रद्द झाल्याने त्यांची आणखीनच अडचण झाली. अखेर सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ते आज सकाळी टोकियोकडे रवाना झाले.

'मंगेश मोपकर यांची टोकियो ऑलिपिंकसाठी निवड होणे, ही नागपूरकरांसाठी आनंद व अभिमानाची बाब आहे. जगातील या सर्वाधिक प्रतिष्ठेच्या स्पर्धेत नागपूरकर पंच दिसणार आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. निवडीबद्दल संघटनेकडून त्यांचे खूपखूप अभिनंदन आणि शुभेच्छा. '
ॲड. आशुतोष पोतनीस, सचिव, नागपूर जिल्हा टेबलटेनिस संघटना
loading image