मोहीम पुन्हा विजयी मार्गावर आणण्याचा गोव्याचा निर्धार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

मडगाव : इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी एफसी गोवा संघाची नेहरू स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. 

गोव्याला मागील सामन्यात मुंबई सिटी एफसीविरुद्ध थोडक्‍यात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे आता ही लढत जिंकून मोहीम विजयी मार्गावर आणण्याचा त्यांना निर्धार आहे. 

मडगाव : इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी एफसी गोवा संघाची नेहरू स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड एफसीविरुद्ध लढत होत आहे. 

गोव्याला मागील सामन्यात मुंबई सिटी एफसीविरुद्ध थोडक्‍यात पराभूत व्हावे लागले. त्यामुळे आता ही लढत जिंकून मोहीम विजयी मार्गावर आणण्याचा त्यांना निर्धार आहे. 

ऍव्रम ग्रॅंट यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या प्रतिस्पर्ध्याला हरविल्यास गोवा गुणतक्‍त्यात चौथे स्थान गाठू शकेल. सर्जीओ लॉबेरा प्रशिक्षक असलेल्या गोव्याचा सध्या सहावा क्रमांक आहे. 11 सामन्यांतून त्यांचे 19 गुण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या एफसी पुणे सिटीच्या तुलनेत गोव्याचे दोन, तर चौथ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीच्या तुलनेत तीन सामने कमी आहेत. पुणे आणि जमशेदपूर यांचे प्रत्येकी 22 गुण आहेत. 

लॉबेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की समान सामने झाले असताना चौथा, पाचवा अथवा सहावा क्रमांक निवडायचा, पहिला पर्याय किंवा सामने हातात बाकी असणे असा दुसरा पर्याय मला कुणी दिला, तर मी दुसऱ्या पर्यायास प्राधान्य देईन. त्यामुळे आम्हाला गुणतक्‍त्यात वरचे स्थान मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. इतर प्रशिक्षकसुद्धा याच पर्यायाला पसंती देतील, अशी मला खात्री आहे. 

प्रत्येक संघाने खेळलेल्या सामन्यांच्या संख्येतील फरक दाखविताना ते म्हणाले, की या घडीला काही संघांचे तीन आहेत, तर काहींचे दोन सामने कमी आहेत. त्यामुळे गुणतक्ता खरे चित्र दाखवत नाही. 

लॉबेरा हे बार्सिलोना युवा संघाचे प्रशिक्षक होते. मागील सामन्यानंतर गोव्याला इतर संघांनी मागे टाकले आहे. यामुळे संघावर दडपण आल्याची शक्‍यता लॉबेरा यांनी फेटाळून लावली. ते म्हणाले, की आमच्यावर या घडीला दडपण नाही. संघात केवळ उत्सुकता आहे. खडतर ठरलेल्या मागील मोसमाच्या तुलनेत, कामगिरीत सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रेरित झालो आहोत. 

गोव्याने मोरोक्कोचा 22 वर्षांचा मध्यरक्षक ह्युगो अदनान बौमौस याला करारबद्ध केले आहे. मध्य फळीतील सेरीटॉन फर्नांडिस मात्र मागील सामन्यातील निलंबनामुळे खेळू शकणार नाही. 

संघाच्या निवडीविषयी लॉबेरा म्हणाले, की आम्ही बदल करू; पण शैली कायम राहील. 

बाद फेरीसाठी गोवा संघ शर्यतीत आघाडीवर आहे यात शंका नाही; पण आधी त्यांना नॉर्थईस्टचे आव्हान परतावून लावणे आवश्‍यक आहे. गुवाहाटीतील सामन्यात गोव्याला 1-2 असे पराभूत व्हावे लागले होते. नॉर्थईस्टच्या बाद फेरीच्या आशा जवळपास संपल्यात जमा आहेत. यानंतरही मोसमाची सांगता तरी चांगली करण्याची त्यांची इच्छा असेल. ग्रॅंट यांना पाचारण केल्यानंतर त्यांच्या कामगिरीत मोठा फरक पडला आहे. नॉर्थईस्टने चांगल्या कामगिरीची क्षमता प्रदर्शित केली असली तरी त्यांना सातत्य राखता आलेले नाही. मागील सामन्यात नॉर्थईस्टला बंगळूर एफसीविरुद्ध 1-2 असे पराभूत व्हावे लागले.

Web Title: marathi news football news Indian Super League