भारतीय कुस्तीगिरांची फ्रीस्टाइलमध्ये निराशा

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

मुंबई : भारतीय कुस्तीगीर फ्रीस्टाइलमध्ये ताकदवान आहेत असे समजले जात आहे, पण आशियाई कुस्तीत भारतास या प्रकारात अखेर दोनच पदकांवर समाधान मानावे लागले. नवजोत कौरचे सुवर्णपदक हेच या स्पर्धेतील भारताचे एकमेव विजेतेपद ठरले. ही स्पर्धा किर्गिझस्तानमध्ये बिश्‍केक येथे सुरू आहे. 

मुंबई : भारतीय कुस्तीगीर फ्रीस्टाइलमध्ये ताकदवान आहेत असे समजले जात आहे, पण आशियाई कुस्तीत भारतास या प्रकारात अखेर दोनच पदकांवर समाधान मानावे लागले. नवजोत कौरचे सुवर्णपदक हेच या स्पर्धेतील भारताचे एकमेव विजेतेपद ठरले. ही स्पर्धा किर्गिझस्तानमध्ये बिश्‍केक येथे सुरू आहे. 

आशियाई क्रीडा स्पर्धा काही महिन्यांवर असताना भारतीय कुस्तीगिरांना केवळ आठ पदके जिंकता आली. गेल्या दोन स्पर्धांतील कामगिरीच्या तुलनेत ही पीछेहाटच आहे. भारताने 2016 च्या स्पर्धेत एक सुवर्ण, तीन रौप्य आणि पाच ब्रॉंझ अशी नऊ, तर गतवर्षी यजमान असताना एक सुवर्ण, पाच रौप्य आणि चार ब्रॉंझ अशी कमाई केली होती. या वेळी एक सुवर्ण, एक रौप्य आणि सहा ब्रॉंझ हीच कमाई झाली. अखेरच्या दिवशी भारतास एकही पदक जिंकता आले नाही. ग्रीको रोमन, फ्रीस्टाइल, तसेच महिला प्रकारात प्रत्येकी दोन, असे सहा वजनी गट वाढल्यानंतरही भारताची पदके कमी झाली आहेत. 

दोन कुस्तीगिरांची ब्रॉंझपदकाच्या लढतीतील हार हीच शेवटच्या दिवसाची जमेची बाब म्हणता येईल. दीपक पुनिया 86 किलो गटात चीनच्या शेंगफेंग बी याच्याविरुद्ध पराजित झाला. दीपक 0-10 मागे पडल्यावर लढत थांबविण्यात आली. श्रवण काहीसा दुर्दैवी ठरला. 61 किलो गटातील उझबेकिस्तानच्या राखमोनोव अब्बोस याच्याविरुद्ध त्याने लढतीतील अखेरचा गुण गमावल्याने तो 6-6 बरोबरीनंतर पराजित झाला. 

सुशीलचा पर्याय पात्रतेतच गारद 
सुशीलकुमार जखमी झाल्यामुळे त्याच्याऐवजी निवडलेला परवीन राणा 74 किलो गटाच्या पात्रता फेरीतच गारद झाला. इराणच्या मोस्तफा होस्सनेइनखानी याने परवीनला 5-0 असे सहज हरवले. सुमित 125 किलो गटाच्या पात्रता फेरीत कोरियाच्या नॅम झॉंगजिन याच्याविरुद्ध 4-6 असा पराभूत झाला, तर सोमवीरने 92 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या झुशेन लीनविरुद्धच्या लढतीत 0-10 अशी पिछाडी पत्करली. 

भारत अव्वल पाचमध्ये नाही 
निराशाजनक कामगिरीमुळे भारत सांघिक क्रमवारीत अव्वल पाचमध्ये आला नाही. नवजोत कौरच्या सुवर्णपदकानंतरही भारतीय महिला संघ सातवा आला. भारताचे 92 गुण झाले, तर आघाडीवरील कझाकिस्तानचे 157. पहिल्या सहा देशांनी शंभरपेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. ग्रीको रोमनमध्ये भारत 92 गुणांसह सातवा आला, तर अव्वल किर्गीझस्तानचे 157 गुण आहेत. 

Web Title: marathi news Freestyle Wrestling Asian wrestling championship