esakal | गब्बरची कर्णधाराला साजेशी खेळी, लंकेचा सात गड्यांनी पराभव
sakal

बोलून बातमी शोधा

गब्बरची कर्णधाराला साजेशी खेळी, लंकेचा सात गड्यांनी पराभव

गब्बरची कर्णधाराला साजेशी खेळी, लंकेचा सात गड्यांनी पराभव

sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोलंबो : धोकादायक ठरू शकणाऱ्या आव्हानासमोर सहकारी फलंदाज अतिआक्रमक सुरुवात करून बाद होत असताना शिखर धवनने कर्णधाराची जबाबदारी ओळखून संयमी फलंदाजी केली आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतास ७ गडी आणि ८० चेंडू राखून सहज विजयी केले. श्रीलंकेच्या आघाडीच्या सहापैकी पाच फलंदाजांनी २५ पेक्षा जास्त धावा केल्यावर अर्धशतक करता आले नाही. डावातील सर्वाधिक धावा आठव्या क्रमांकावरील चमिका करुणारत्ने याने केल्या. करुणारत्नेच्या या आक्रमकतेमुळे श्रीलंकेने २६२ धावांचे आव्हान दिले. पृथ्वी शॉ आणि ईशान किशनच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे भारताने १७.५ षटकांतच १४३ धावा केल्या होत्या, पण पृथ्वी तसेच ईशानने न दाखवलेला संयम धवनने दाखवला आणि तीन अर्धशतकी भागीदारी करीत भारतास विजयी केले.

पृथ्वी शॉने तडाखेबाज सुरुवात केल्यामुळे भारताचे अर्धशतक ४.५ षटकांत झाले. उंचावरून फटका काहीसा लवकर खेळल्याने तो परतला. ईशान किशन शॉच्या तुलनेत कमी आक्रमक होता. त्याच्या खेळीत तुलनेत जास्त संयम होता. तो चपळ झेलामुळे परतला. धवनने या वेळी क्वचितच चूक केली. त्याने शॉसह ५८, ईशानसह ८५ आणि मनीष पांडेसह ७२ धावा जोडत भारतास विजयी पथावर नेले. धवन आणि सूर्यकुमार यादवने ४८ धावांची नाबाद भागीदारी करीत भारताचा विजय निश्चित केला.

हेही वाचा: पवार-मोदी भेटीमुळे काँग्रेस बॅकफूटवर; नव्या समीकरणाची चर्चा

खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना काहीशी साथ देत होती, पण त्याचा फायदा भारतीय घेऊ शकले नाहीत. सहा गोलंदाजांचा वापर झाला, पण दोघांनीच १० षटके पूर्ण केली. दीपक चहर, युजवेंद्र चहल, तसेच कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, पण या तिघांपेक्षा सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी कृणाल पंड्याची झाली. भुवनेश्वर तसेच हार्दिक पंड्या अपयशी ठरत असताना कृणालने १० षटके मारा करीत केवळ २६ धावाच दिल्या.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका ९ बाद २६२

(अविष्का फर्नांडो ३२- ३५ चेंडूंत २ चौकार व १ षटकार, मिनोद भानुका २७ ४४ चेंडूंत ३ चौकार, भानुका राजापक्षा २४- २२ चेंडूत २ चौकार व २ षटकार, चरिथ असलंका ३८- ६५ चेंडूत १ चौकार, दासून शनाका ३९ ५० चेंडूत २ चौकार व १ षटकार, चमिका करुणारत्ना नाबाद ४३- ३५ चेंडूत १ चौकार व २ षटकार, दुश्मांता चमिरा नाबाद १३ ६ चेंडूत १ चौकार व १ षटकार, अवांतर १६ १२ वाईड आणि १ नो बॉलसह, भुवनेश्वर कुमार ९-०-६३-०, दीपक चहर ७-१-३७-२, हार्दिक पंड्या ५-०-३३-१. युजवेंद्र चहल १०-०-५२-२, कुलदीप यादव ९-१-४८-२, कृणाल पंड्या १०-१-२६-१)

भारत ३६.४ षटकांत ३ बाद २६३ (पृथ्वी शॉ) ४३- २४ चेंडूंत ९ चौकार, शिखर धवन नाबाद ८६ ९५ चेंडूंत ६ चौकार आणि १ षटकार, ईशान किशन ५९ ४२ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकार, मनीष पांडे २६-४० चेंडूत १ चौकार व १ षटकार, सूर्यकुमार यादव नाबाद ३१- २० चेंडूत ५ चौकार)

loading image