मो फराहकडून अधिकृत ‘डोपिंग’

रॉयटर्स
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

लंडन - गैरमार्गाने उत्तेजकाचे सेवन करून फसवणूक करण्याची प्रकरणे समोर येत असतानाच पाच व दहा हजार मीटर शर्यतीतील ऑलिंपिक विजेत्या ग्रेट ब्रिटनच्या मो फराहने २०१४ च्या लंडन मॅरेथॉन स्पर्धेपूर्वी अधिकृतरीत्या ‘डोपिंग’ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लंडन - गैरमार्गाने उत्तेजकाचे सेवन करून फसवणूक करण्याची प्रकरणे समोर येत असतानाच पाच व दहा हजार मीटर शर्यतीतील ऑलिंपिक विजेत्या ग्रेट ब्रिटनच्या मो फराहने २०१४ च्या लंडन मॅरेथॉन स्पर्धेपूर्वी अधिकृतरीत्या ‘डोपिंग’ केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

फराहने तीन वर्षांपूर्वी लंडन मॅरेथॉन स्पर्धेपूर्वी इंजेक्‍शनद्वारे कायद्याच्या चौकटीत बसून ‘डोपिंग’ केल्याची माहिती त्याला इंजेक्‍शन देणाऱ्या डॉक्‍टरांनीच उघड केली आहे. इंग्लंडच्या ॲथलेटिक्‍स संघटनेचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रॉबिन चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी लंडन मॅरेथॉनपूर्वी फराहला एल-कार्निटाईन या उत्तेजकाचा १३.५ मिलिइतका डोस इंजेक्‍शनद्वारे दिला होता. त्याच्या या उपचाराची योग्य पद्धतीने नोंद घेण्यात आली नसल्याचेही डॉ. रॉबिन यांनी मान्य केले आहे.

लंडन मॅरेथॉन स्पर्धेद्वारे फराहने मॅरेथॉनमध्ये पदार्पण केले होते. त्याला उत्तेजकाचा डोस मार्गदर्शक तत्त्वात नमूद करण्यात आलेल्या डोसपेक्षा कमी देण्यात आले होते; मात्र तशी नोंद करणे आवश्‍यक असते. ही नोंदच आवश्‍यक असलेल्या फॉर्ममध्ये करण्यात आलेली नव्हती. डॉ. रॉबिन आता इंग्लंडच्या फुटबॉल संघासाठी काम करतात. ते म्हणाले, ‘‘तुम्ही जर घेतलेल्या उपचारांची सरळपणे नोंद केली नसेल, तर असा प्रकार चुकून विसरण्यात आला असे मानण्यात येते. तेच फराहच्या बाबतीत घडले.’’

दरम्यान, फराहने आपण काहीही चुकीचे केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. इंग्लंड ॲथलेटिक्‍स संघटनेचे अध्यक्ष एडी वॉर्नर यांनीदेखील डॉ. रॉबिन यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, ‘‘हे दुर्दैवी आहे. जे घडले ते घडायला नको होते. फराहवर जे काही उपचार करण्यात आले, त्याची नोंद करण्यात आली होती.’’

गेल्याच आठवड्यात ब्रिटनच्या ब्रॅडली विगिन्स या सायकलपटूनेदेखील आपण घेतलेल्या उपचारांची माहिती लपवल्याचे मान्य केले होते; मात्र वॉर्नर यांनी फराह आणि विगिन्स यांच्या प्रकरणात काही साम्य नसल्याचे सांगितले. त्यांच्यात तुलना करणे बरोबर नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

काय आहे एल-कॅर्निटाइन
एल-कॅर्निटाइन हे शारीरिक क्षमता वाढवणारे उत्तेजक असले, तरी त्याला ‘वाडा’च्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. अर्थात त्याचा डोस ५० मिलिपेक्षा अधिक असू नये, तसेच स्पर्धेपूर्वी सहा तास आधी ते घेण्यात येऊ नये, अशी अट टाकण्यात आली आहे.

Web Title: Mo Farah