खलीलने केले जलील; पण विराट नाही खजील 

खलीलने केले जलील; पण विराट नाही खजील 

आयपीएलच्या 12व्या पर्वातील एक संस्मरणीय क्षण शनिवारी घडला. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा डावखुरा युवा गोलंदाज खलिल अहमद याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या आक्रमणाला यशस्वी प्रत्युत्तर दिले. त्याने विराटची विकेट टिपली आणि जोरदार जल्लोष केला. 

सामन्याची सुरवात नाट्यमय झाली होती. भुवनेश्वर कुमारकडून पहिल्याच चेंडूवर वाइड पडला. पार्थिव पटेल स्ट्राईकवर असताना पुढील दोन (पहिले दोन) चेंडू डॉट ठरले. तिसऱ्या चेंडूवर पार्थिवचा बॅकवर्ड पॉइंटला उडालेला झेल मनीष पांडेने टिपला. विराटला स्ट्राईक मिळाली. पहिला चेंडू डॉट ठरला. पाचव्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटला चौकार मारत विराटने खाते उघडले. अखेरच्या चेंडूवर एकेरी धाव घेत विराटने स्ट्राईक राखली. 

दुसरे षटक टाकण्यासाठी खलिल आला. पहिलाच चेंडू फ्रंट फुटवर येत विराटने मिडॉफला सीमापार केला. मग दुसऱ्या चेंडूवर त्याने मिडॉनला षटकार खेचला. तिसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली. स्ट्राईक मिळालेला नवा फलंदाज एबी डिव्हीलीयर्सने एकेरी धाव घेत पुन्हा विराटला स्ट्राईक दिली. पाचव्या चेंडूवर विराटने पुढे येत ऑफ साईडला ड्राईव्हचा प्रयत्न केला, पण तो चकला आणि झेल यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने टिपला. त्याचवेळी खलीलने जिगर प्रदर्शित केली. त्याने क्रीजकडे डाव्या हाताचे बोट केले, मग उजवा हात वाकवून जिगर व्यक्त केली. त्यानंतर दोन्ही हात कोपऱ्यात वाकवून मुठी आवळत जोरदार जल्लोष केला. 

विराटची विकेट सनरायझर्ससाठी मोलाची होती आणि ही बहुमोल कामगिरी पार पाडल्याचा खलीलला अत्यानंद झाला होता. या क्षणाचा व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर तो वेगाने व्हायरल होऊ लागला. विराट लवकर बाद होऊनही आरसीबीला चांगली धावसंख्या उभारता आली. घरच्या मैदानावर चाहत्यांचा निरोप तरी किमान विजयाने घेता आला याचे आरसीबीला समाधान लाभले. 

सामना जिंकल्यानंतर बक्षीस समारंभ सुरू असताना दोन्ही संघांतील खेळाडू उभे होते. त्यावेळी विराटने खलिल गेला. त्यावेळी त्याने खास दिल्ली स्टाईलमध्ये विचारले असावे की, तू क्‍या सेलिब्रेट कर रहा था... 

मग विराटनेच त्याची हसत हसत नक्कल केली. मग खलिल सुद्धा हसू आवरले नाही. त्याने विराटला आलिंगन दिले. तेव्हा विराटने गडगडाटी हास्य केले. या क्षणाचा व्हिडिओ सुद्धा टिपण्यात आला असून तो पोस्ट होताच व्हायरल झाला. 

या दोन्ही व्हिडीओवर भरपूर कमेंट्‌स पडत आहेत. त्यातून अनेकांनी कर्णधार म्हणून विराटच्या खेळकर वृत्तीला दाद दिली आहे. काही जणांनी खलिल बहुतेक जिवावर उदार झाला होता, त्याला भारतीय संघाकडून कधी खेळायचे नसावे, अशी टिप्पणी विनोदाने केली. 

अर्थात यातून एक बाब अधोरेखित झाली. ती म्हणजे प्रतिस्पर्धी गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणारा विराटसारखा दादा फलंदाज हा सहकारी देशबांधवांसाठी मात्र यार-दिलदार आहे. खलीलला याची प्रचिती आशिया करंडक स्पर्धेच्यावेळी आली होती. तेव्हा महेंद्रसिंह धोनी याने करंडक उंचावण्याचा बहुमान खलीलला द्यावा अशी सूचना तत्कालीन कर्णधार रोहित शर्मा याला केली होती. रोहीतला ती पसंत पडली. मग खलीलला हा बहुमान लाभला. 

भारताला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचा शोध नेहमीच राहिला आहे. झहीर खान याच्या निवृत्तीनंतर खलीलच्या रूपाने सक्षम पर्याय मिळाला आहे. अशावेळी विराटसारख्या प्रेरणादायी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खलिलचा उदय अपेक्षित आहे. हा खलिल भारतीय क्रिकेटचे आशास्थान ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com