आयपीएल: मुंबईने पुण्यास अवघ्या 1 धावेने नमविले !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

या पूर्ण मोसमामध्ये अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केलेल्या जसप्रित बुमराह (26 धावा - 2 बळी) याने मोक्‍याच्या क्षणी महेंद्रसिंह धोनी (10 धावा - 13 चेंडू) याला यष्टिमागे झेलबाद केल्यानंतर पुण्याचा डाव दडपणाखाली आला होता. अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी 6 धावांची आवश्‍यकता असताना सुपरजायंट्‌सच्या डॅनियन ख्रिश्‍चियन यास चौकार वा षटकार मारण्यात अपयश आले.

हैदराबाद - 10 व्या इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात आज (रविवार) मुंबई इंडियन्सने "रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स' संघाचा अवघ्या 1 धावेने पराभव केला. सामन्यात ऐन वेळी उंचावलेले क्षेत्ररक्षण व गोलंदाजी मुंबईच्या या स्वप्नवत विजयामागील मुख्य घटक ठरले.

या पूर्ण मोसमामध्ये अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केलेल्या जसप्रित बुमराह (26 धावा - 2 बळी) याने मोक्‍याच्या क्षणी महेंद्रसिंह धोनी (10 धावा - 13 चेंडू) याला यष्टिमागे झेलबाद केल्यानंतर पुण्याचा डाव दडपणाखाली आला होता. मात्र रायझिंग सुपरजायंट्‌सचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ (51 धावा - 50 चेंडू) याने झळकाविलेल्या अर्धशतकामुळे हा सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला.

स्मिथ याने बुमराह याला षटकार मारल्यानंतर सुपरजायंट्‌सना अखेरच्या षटकात 13 धावांची आवश्‍यकता होती. मिशेल जॉन्सन याने टाकलेल्या या अखेरच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मनोज तिवारी याने चौकार मारल्यामुळे पुण्यास विजयासाठी पोषक वातावरण निर्माणही झाले होते. परंतु, तिवारी व स्मिथ हे दोघेही लागोपाठच्या चेंडूंवर बाद झाल्यामुळे पुण्यावरील दबाव वाढला. अखेरच्या दोन चेंडूंवर विजयासाठी 6 धावांची आवश्‍यकता असताना सुपरजायंट्‌सच्या डॅनियन ख्रिश्‍चियन यास चौकार वा षटकार मारण्यात अपयश आले.

अखेरच्या दोन्ही चेंडूंवर प्रत्येकी दोनच धावा निघाल्याने मुंबईस नेत्रदीपक विजय मिळाला.

तत्पूर्वी, रायझिंग पुणे सुपरजायंटस संघाने मुंबई इंडियन्सना अवघ्या 129 धावांत रोखण्यात यश मिळविले.

डाव सुरु झाल्यापासूनच नियमित अंतराने फलंदाज गमाविलेल्या मुंबई इंडियन्सना सावरण्याची संधीच पुण्याच्या संघाने दिली नाही. मुंबईचा डावखुरा शैलीदार फलंदाज कृणाल पंड्या (47 धावा - 38 चेंडू) याची आश्‍वासक खेळी हेच मुंबईच्या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. पंड्या व काही प्रमाणात कर्णधार रोहित शर्मा (24 धावा - 22 चेंडू) यांचा अपवाद वगळता मुंबईचा अन्य कुठलाही फलंदाज रायझिंग सुपरजायंट्‌सच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे टिकाव धरु शकला नाही. हार्दिक पंड्या व केरॉन पोलार्ड या मुंबईच्या आक्रमक फलंदाजांना स्वस्तात माघारी परत धाडत सुपरजायंट्‌सच्या गोलंदाजांनी मुंबईस अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यास फारसा वाव ठेवला नाही.

Web Title: Mumbai Indians won 10th IPL Tournament