मुंबई मॅरेथॉनमध्ये कोल्हापूरच्या पाटील-कुंभारची दोस्ती... 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई - तमिळनाडूच्या जी लक्ष्मणने सचिन पाटील आणि दीपक कुंभार या कोल्हापूरकरांना हरवत बाजी मारली खरी; पण पायलट हा सचिनसोबत असल्यामुळे मी त्याला मागे टाकू शकलो नाही, असा दावा गतविजेत्या दीपक कुंभारने केला; मात्र त्याने याबाबत तक्रार करणे टाळले. तोही कोल्हापूरचाच आहे, असे त्याचे त्याबाबतचे उत्तर होते. 

मुंबई - तमिळनाडूच्या जी लक्ष्मणने सचिन पाटील आणि दीपक कुंभार या कोल्हापूरकरांना हरवत बाजी मारली खरी; पण पायलट हा सचिनसोबत असल्यामुळे मी त्याला मागे टाकू शकलो नाही, असा दावा गतविजेत्या दीपक कुंभारने केला; मात्र त्याने याबाबत तक्रार करणे टाळले. तोही कोल्हापूरचाच आहे, असे त्याचे त्याबाबतचे उत्तर होते. 

अखेरचे काही मीटर बाकी असताना मी आणि सचिन बरोबरच धावत होतो. सचिन मागे पडत असताना पायलट (बाइकवर असलेला मार्गावरील स्वयंसेवक) मागे आला आणि त्याने सचिनला प्रोत्साहित करण्यास सुरवात केली. सचिन खूप वर्षे मुंबईत आहे. त्यामुळे त्याच्या ओळखीचे खूप आहेत. पायलटमुळे सचिनचा वेग वाढण्यास मदत झाली असेल. माझाही असा पाठिराखा असता, तर कदाचित मी दुसरा आलो असतो, असे दीपकने सांगितले. 

सचिनने लगेचच ही माझी तक्रार नाही. मला तिसरा का आलास, असे विचारले म्हणून हे सांगितले. सचिन दुसरा आल्यामुळे मला कोणतेही दुःख नाही. आमच्या दोघांची मैत्री खूपच चांगली आहे, असेही आवर्जून सांगितले. लहानपणापासून एकमेकांशी स्पर्धा करतो. कोल्हापूर जिल्ह्यातले आहोत. वीस किलोमीटरवर राहतो. खूप वर्षांपासून ओळखतो, त्याच्याविरुद्ध तक्रार करणार नाही, असेही त्याने सांगितले. 

सचिनला हे पूर्ण मान्य नव्हते. खरे तर मी सुरवातीस आघाडीवर होतो. पोटाचा स्नायू आखडला नसता, तर कदाचित लक्ष्मणलाही मागे टाकले असते, असे सांगितले. आमच्या दोघांत काही फार अंतर नव्हते. आघाडी बदलती होती. पायलट नसतानाही मी आघाडीवर होतो. आता मुंबईत एवढी वर्षे राहिल्यावर जास्त प्रोत्साहन अपेक्षितच असते, असेही सचिन म्हणाला. 

लक्ष्मणने तीन वर्षांपासून भारतात एकही अर्धमॅरेथॉन गमावली नाही. ही अपराजित मालिका कायम राहिली, याचे समाधान होते. आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धांची पूर्वतयारी असल्यामुळे या स्पर्धेपासून दूर होतो. आता चार वर्षांनी टोकियोत मॅरेथॉन धावायची आहे. त्यामुळे सुरवात करावीच लागणार, त्याला मुंबईतून सुरवात केली, असे त्याने सांगितले.

Web Title: mumbai martahon sachin patil-deepak kumbhar