पावसाबाबतचा नियम मुंबईला अमान्य

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

साखळीतील कामगिरी बाद फेरीचा निकाल कशी ठरवते, अशी संतप्त विचारणा मुंबई क्रिकेट संघव्यवस्थापन करीत आहे. विजय हजारे स्पर्धेतील मुंबई-झारखंड सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. साखळीत झारखंडने सरस कामगिरी केल्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला.

मुंबई : साखळीतील कामगिरी बाद फेरीचा निकाल कशी ठरवते, अशी संतप्त विचारणा मुंबई क्रिकेट संघव्यवस्थापन करीत आहे. विजय हजारे स्पर्धेतील मुंबई-झारखंड सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. साखळीत झारखंडने सरस कामगिरी केल्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला.

झारखंडविरुद्धच्या लढतीत मुंबईसमोर विजयासाठी 35 षटकांत 195 धावांचे लक्ष्य होते. मुंबईने 11.3 षटकांत बिनबाद 95 अशी सुरुवात केली होती, त्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. प्रतिस्पर्धी संघ किमान 20 षटके न खेळल्यामुळे साखळीतील कामगिरी लक्षात घेऊन छत्तीसगडने आगेकूच केल्याचे जाहीर करण्यात आले.

हा नियम अन्यायकारक आहे. यात बदल करण्याची नक्कीच आम्ही मागणी करणार आहोत. साखळीतील कामगिरीनुसार बाद फेरीच्या लढतीचा निकाल कसा ठरतो; प्रत्येक दिवशी नवा सामना होत असतो. अन्यथा या प्रकारे चांगले संघ स्पर्धेतून बाद होतील, असे मुंबई क्रिकेट संघासोबतच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई क्रिकेट संघटना पदाधिकारी याबाबत चर्चा करणार आहेत. ज्या क्षणी लढत थांबली, त्यावेळच्या स्थितीत डकवर्थ लुईस नियम असता तर काय स्थिती असती हे लक्षात घेऊन आम्ही पत्र लिहिणार आहोत, असे मुंबई क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

साखळीतील कामगिरी हा निकष कसा ठरतो. आम्ही खडतर ब गटात आठ लढती जिंकल्या होत्या, तर तमिळनाडूने तुलनेत कमकुवत असलेल्या क गटात नऊ लढती जिंकल्या. हा नियम असेल तर तळाच्या गटात असणेच चांगले. बाद फेरीच्या लढतीसाठी राखीव दिवस हवा होता.
- मनदीप सिंग, पंजाब कर्णधार

स्पर्धेतील नियमाची सर्व संघांना स्पर्धेपूर्वीच पूर्ण कल्पना दण्यात आली होती. अर्थात खेळाडूंचे मत आमच्यासाठी कायम मोलाचे असेल. नियमामुळे हार झाली की वैफल्य येणे स्वाभाविक आहे; पण स्पर्धा सुरू झाल्यावर नियम कसा बदलणार.
- साबा करीम, भारतीय मंडळाचे क्रिकेट व्यवस्थापक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai target rain rule in vijay hazare trophy