महाराष्ट्राच्या खेळाडूंचा झंझावात कायम

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विविध खेळांमध्ये पदकांची लयलूट
जलतरण
जलतरणSakal

महाराष्ट्राच्या खेळाडूंची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकांची लयलूट बुधवारीही कायम राहिली. तिरंदाजी, डायव्हिंग, टेनिस, स्क्वॉश, जलतरण या खेळांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांना गवसणी घालत आपली घोडदौड कायम ठेवली.

आंतरराष्ट्रीय तिरंदाज ओजस देवतळे, प्रथमेश जवकर, प्रथमेश फुगे आणि पार्थ कोरडे यांनी अचूक निशाणा साधत विजयादशमीला महाराष्ट्र संघासाठी ब्राँझपदकावर मोहोर उमटवली. महाराष्ट्र संघाने पदकाच्या लढतीत उत्तराखंडला नमवले. महाराष्ट्र संघाने १३२- १२० ने विजय संपादन केला.

ऋतिकाचे डायव्हिंगमध्ये यश

राजकोट येथे सुरू असलेल्या डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीराम हिने हाय बोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्णपदक जिंकून लागोपाठ दुसरे विजेतेपद मिळवले. याआधी या स्पर्धेत तिने तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती. याच प्रकारात ब्राँझपदक जिंकणाऱ्या ईशा वाघमोडे हिने हाय बोर्ड डायव्हिंग प्रकारातही ब्राँझपदकाची कमाई केली.

अर्जुनचे सुवर्ण हुकले

महाराष्ट्राचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अर्जुन कढे याने मनीष कुमार विरुद्ध पहिला सेट जिंकूनही त्याला पाठीतील दुखण्यामुळे सुवर्णपदकाचे स्वप्न साकारता आले नाही. टेनिसच्या एकेरीतील लढतीत त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले‌. मिश्र दुहेरीत त्याने ऋतुजा भोसले हिच्या साथीत सुवर्णपदक जिंकले.

स्क्वॉशमध्ये रौप्यपदक

महाराष्ट्राच्या स्क्वॉश संघाने पुरुष गटात रौप्यपदक पटकावले. अंतिम फेरीत तामिळनाडूने २-१ ने महाराष्ट्र संघाचा पराभव केला. या संघात राहुल बैठा, सुरज चंद, मोहित भट व ओम सेमवाल या खेळाडूंचा समावेश आहे.

जलतरणात आरतीला रौप्य

जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या आरती पाटील हिने ५० मीटर्स ब्रेस्टस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक जिंकले, तर स्वेजल मानकर याने ५० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत ब्राँझपदकावर नाव कोरले. मुलांच्या चार बाय दोनशे मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत महाराष्ट्राला ब्राँझपदक मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com