इंग्लंडला बरोबरीत रोखणाऱ्या अमेरिकेचे पॅकअप; नेदरलँडने गाठली क्वार्टर फायनल | FIFA World Cup 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Netherlands Defeat USA Reached Quarter Final Of FIFA World Cup 2022

FIFA World Cup 2022 : इंग्लंडला बरोबरीत रोखणाऱ्या अमेरिकेचे पॅकअप; नेदरलँडने गाठली क्वार्टर फायनल

Netherlands Defeat USA Reached Quarter Final : नेदरलँडने अमेरिकेचे 3 - 1 असा पराभव करत फिफा वर्ल्डकप 2022 ची क्वार्टर फायनल गाठली. नेदरलँडने पहिल्या हाफमध्ये दोन गोल करत अमेरिकेवर दबाव वाढवला होता. मात्र दुसऱ्या हाफमध्ये अमेरिकेने झुंजार खेळ करत 76 व्या मिनिटाला गोल करत सामना जिवंत ठेवला. मात्र नेदरलँडच्या डमफायर्सने 81 व्या मिनिटाला तिसरा गोल करत अमेरिकेचा पराभव निश्चित केला. विशेष म्हणजे अमेरिकेने साखळी फेरीत संभाव्य विजेत्यांमध्ये गणाल्या जाणाऱ्या इंग्लंडला बरोबरीत रोखले होते. मात्र बाद फेरीत त्यांना आपला खेळ उंचावता आला नाही. नेदरलँडकडून मेम्फिस डेपे (10), डॅले ब्लिंड्स (45-1) आणि मिडफिल्डर डेनझेल (81) यांनी गोल केले. तर अमेरिकेकडून हाजी राईटने (76) एकमेव गोल केला.

बाद फेरीतील पहिला सामना नेदरलँड आणि अमेरिका यांच्यात झाला. पहिल्या हाफपासूनच तुलनेने बलाढ्य असलेल्या नेदरलँडने सामन्यावर आपले नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला. सामन्याच्या 10 व्या मिनिटालाच मेम्फिस डेपेने गोल करत नेदरलँडला आघाडी मिळवून दिली. यानंतर अमेरिकेने हा गोल फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र नेदरलँडने पहिल्या हाफमध्ये सामन्याचे नियंत्रण आपल्याकडेच ठेवले. दरम्यान, पहिल्या हाफच्या स्टॉपेज टाईममध्ये पहिल्याच मिनिटाला नेदरलँडच्या डॅले ब्लिंड्सने दुसरा गोल करत अमेरिकेला अजून एक धक्का दिला. ब्लिंड्स हा नेदरलँडकडून वर्ल्डकपमध्ये गोल करणारा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.

पहिल्या हाफमध्ये दोन गोल खाल्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये अमेरिकेने नेदरलँडच्या गोलपोस्टवरील आक्रमण वाढवण्यास सुरूवात केली. अमेरिकेला गोल करण्याची संधी देखील मिळाल्या मात्र त्यांचे फटके गोलपोस्टच्या वरून गेले तर नोपर्टने देखील अमेरिकेचे काही प्रयत्न हाणून पाडले. अखेर अमेरिकेला 76 व्या मिनिटाला अमेरिकेने गोल करण्याची संधी दवडली नाही. पुलिसिकच्या सहाय्याने हाजी राईटने नेदरलँडवर पहिला गोल करत सामना 2 -1 असा आणला. अमेरिकेने दुसऱ्या हाफमध्ये नेदरलँडचा गोलकिपर नोपर्टला चांगलेच बिझी ठेवले.

मात्र अमेरिका दुसरा गोल करत सामना बरोबरीत आणणार असे वाटत असतानाच नेदरलँडने अमेरिकेच्या गोलपोस्टवर डाव्या बाजूने हल्ला चढवला. 81 व्या मिनिटाला नेदरलँडच्या मिडफिल्डर डेनझेल डमफायर्सने गोल करत आघाडी 3 - 1 अशी नेली. या गोलसाठी ब्लिंडने सहाय्य केले. या गोलनंतर अमेरिकेची सामन्यात पुनरागमन करण्याची आशा जवळपास मावळली. अखेर नेदरलँडने अमेरिकेचा 3 - 1 असा पराभव करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'