NZ vs AFG : एकही सामना न जिंकता अफगाणिस्तानने उघडले गुणांचे खाते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Afghanistan Vs New Zealand T20 World Cup 2022

NZ vs AFG : एकही सामना न जिंकता अफगाणिस्तानने उघडले गुणांचे खाते

Afghanistan Vs New Zealand T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये आज मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर दोन सामने झाले. पहिला सामना हा इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात झाला होता. हा सामना आयर्लंडने 5 धावांनी जिंकत सुपर 12 च्या ग्रुप 1 मध्ये मोठा उलटफेर केला. आयर्लंडच्या झुंजार खेळीला वरूणराजांची देखील साथ लाभली. या सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार लागला. याच मैदानावर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजत ग्रुप 1 मधीलच अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार होता. मात्र वरूणराजा काही ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. त्यामुळे हा सामना एकही चेंडू न खेळवता सामना वॉश आऊट झाला.

हेही वाचा: ICC T20 Ranking : अखेर विराटची प्रतिक्षा संपली; सूर्यकुमारला मात्र बसला फटका

मेलबर्नवरील न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना जरी वॉश आऊट झाला असला तरी या दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळाला आहे. त्यामुळे आतापर्यंत दोन झालेल्या अफगाणिस्तानने एकाही सामन्यात विजय न मिळवता गुणतालिकेतील आपले गुणांचे खाते उघडले. न्यूझीलंडला देखील एक गुण मिळाला असून आता ग्रुप 1 मध्ये 3 गुण घेऊन अव्वल स्थानावर आहेत. पहिल्या सामन्यात त्यांनी यजमान ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

ग्रुप 1 मध्ये प्रत्येक संघाचे प्रत्येकी 2 सामने झाले असून न्यूझीलंड 3 गुण घेऊन अव्वल स्थानावर आहे. तर श्रीलंका, इंग्लंड, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांचे प्रत्येकी 2 गुण झाले आहेत. मात्र +0.450 रनरेट राखत श्रीलंका दुसऱ्या तर +0.144 रनरेटमुळे इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. -1.068 धावगती असलेल्या आयर्लंडने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत चौथे स्थान मिळवले आहे. तर -1.555 धावगती असलेला ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर आहे. एकही सामना जिंकू न शकलेला अफगाणिस्तान वरूणराजाच्या कृपेणे मिळालेला 1 गुण घेऊन ताळात म्हणजे सहाव्या स्थानावर आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2022 Australia : मंकीगेट ते सिराज प्रकरण; सिडनीत टीम इंडिया अन् वाद ठरलेलं समीकरण

आज मेलबर्नवर झालेल्या पहिल्या सामन्यात टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये पात्रता फेरीतून सुपर 12 फेरीत आलेल्या आयर्लंडने विजेतेपदाचे दावेदार असलेल्या इंग्लंडला 5 विकेट्सनी पराभव करत मोठा धक्का दिला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडने इंग्लंडसमोर 158 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र इंग्लंडचा निम्मा संघ 86 धावात माघारी धाडत आयर्लंडने इंग्लंडच्या बलाढ्य फलंदाजीला चांगलेच झुंजवले. दरम्यान मोईन अलीने आक्रमक फलंदाजी करत संघाला 14.3 षटकात 105 धावांपर्यंत पोहचवले. मात्र पावसामुळे सामना थांबला आणि डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंड 5 धावांनी पराभूत झाली. आयर्लंडकडून जोशुआ लिटिलने 2 बळी घेतले. तर हँड आणि बॅरी मॅकार्थे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.