निमगाव म्हाळुंगीच्या आश्रमशाळेतील तीन मुलींची हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nimgaon mhalungi ashramshala girls

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील श्रीमती बबईताई टाकळकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील तीन मुलींची ५१ व्या हिंद केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Wrestling Competition : निमगाव म्हाळुंगीच्या आश्रमशाळेतील तीन मुलींची हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड

तळेगाव ढमढेरे - निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील श्रीमती बबईताई टाकळकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील तीन मुलींची ५१ व्या हिंद केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पठारे क्रीडा संकुल खराडी पुणे येथे भारतीय शैली कुस्ती महासंघातर्फे ५१ व्या हिंदकेसरी मातीवरील कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी निमगाव म्हाळुंगी येथील श्रीमती बबईताई टाकळकर प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील अश्विनी किशोर विटकर, आरती नवनाथ पवार व सोनिका नंदू चव्हाण या तीन मुलींची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे.

देश पातळीवरील ५१ वी हिंदकेसरी माती कुस्ती स्पर्धा ६ ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत हैद्राबाद -तेलंगणा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी आश्रमशाळेतील तीन मुलींची महाराष्ट्र संघामध्ये निवड झाली आहे. तसेच महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजर म्हणून आश्रमशाळेचे अधीक्षक झेंडू पवार यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या तीनही मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण अधीक्षक झेंडू पवार यांनी दिली आहे.

हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या तीन मुलींचा व मार्गदर्शक शिक्षक झेंडू पवार यांचा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुढील स्पर्धेसाठी मुलींना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुदामराव चव्हाण, सचिव कांतीलाल टाकळकर, दशरथ लांडगे, काळुराम चव्हाण, मुख्याध्यापिका लता चव्हाण व सुनिता करपे, चित्रा मुळे, जागृती वाळके आदी उपस्थित होते.

'आश्रमशाळेतील मुलींनी कुस्ती स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी विशेष कौतुक केले असून, यापूर्वीही या आश्रमशाळेतील मुलींनी राष्ट्रीय पातळीवर कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. आगामी काळातही शिक्षण संस्थेच्या विविध शाखांतर्फे अभ्यासाबरोबरच विविध खेळांना विशेष प्राधान्य दिले जाईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उज्वल यश मिळवावे अशी अपेक्षा श्री पलांडे यांनी व्यक्त केली.'