कबड्डी विश्‍वकरंडक जिंकला, तरी बक्षीसच देत नाहीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

मुंबई - विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले; पण मला काय किंवा माझ्या कोणत्याही सहकाऱ्यास राज्य सरकारने बक्षीस जाहीर केलेले नाही. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही संपूर्ण संघाला दहा लाखांचेच बक्षीस दिले, अशी खंत भारताचा अव्वल चढाईपटू अजय ठाकूरने व्यक्त केली.

मुंबई - विश्‍वकरंडक कबड्डी स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आले; पण मला काय किंवा माझ्या कोणत्याही सहकाऱ्यास राज्य सरकारने बक्षीस जाहीर केलेले नाही. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही संपूर्ण संघाला दहा लाखांचेच बक्षीस दिले, अशी खंत भारताचा अव्वल चढाईपटू अजय ठाकूरने व्यक्त केली.

भारतीय कबड्डी संघाने विश्‍वकरंडक जिंकून जवळपास एक आठवडा झाला, तरी अद्याप कोणत्याही राज्य सरकारने आपल्या खेळाडूसाठी बक्षीस जाहीर केलेले नाही.
विश्‍वकरंडक जिंकू शकेन असे मला स्वप्नातही कधी वाटले नव्हते, त्याचबरोबर कबड्डी हा क्रीडा प्रकार देशात एवढा लोकप्रिय होईल, असेही कधी वाटले नव्हते. भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा अनुभव कधीही विसरणार नाही, असे अजयने सांगितले. मात्र, त्याचबरोबर त्याला आपल्या, तसेच संघाच्या यशाची अपेक्षित दखल घेतली गेली नाही, याचीही खंत आहे.

आतापर्यंत संघातील कोणासही कोणतेही बक्षीस कोणा सरकारने किंवा संघटनेने जाहीर केले नाही. केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी संघाला दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले. आता ही रक्कम सर्व खेळाडूंत वाटली गेली तर किती रक्कम येईल, हे तुम्ही जाणता. आमच्यावर बक्षिसांचा वर्षाव करा, अशी आमची कधीही अपेक्षा नाही; पण खेळातील यशाचे कौतुक व्हायलाच हवे, असेही त्याने सांगितले.

मॅटवरील वर्षभर सराव हेच बक्षीस
भारतीय कबड्डी संघाचे शिबिर यापूर्वी मैदानावर होत असे. हे शिबिर आता मॅटवर झाले. हे शिबिर, त्याद्वारे झालेला सराव जवळपास एक वर्ष सुरू होता. त्याचा नक्कीच फायदा झाला आहे, असे सांगत अजय ठाकूरने स्वतःचे समाधान करून घेतले. आता मी हा खेळ पैशांसाठी कधीच खेळलो नाही, त्यामुळे आताही खेळतच राहणार. खेळाच्या सुविधा चांगल्या मिळाल्या तर त्याचा फायदाच होतो, असेही त्याने सांगितले.

Web Title: No prize after winning Kabbadi World Cup