"मराठी' म्हणून कधीच डावललं जात नाही!: केदार जाधव

स्वप्निल जोगी: सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

विराटप्रमाणेच 'धोनीभाईं'चाही मला खूप आधार आहे. त्यांच्यामुळे माझी प्रगल्भता वाढली. दबावाखाली काम कसं करावं, ते मला धोनीभाईंनी शिकवलं ! खरंतर, धोनीभाई आणि विराट फार वेगळे नाहीत. ..

पुणे - ""मराठी' असल्याने राष्ट्रीय संघामध्ये महाराष्ट्रातल्या खेळाडूंना डावललं जातं, हे मानणं अतिशय चूक आहे. तसं मुळीच घडत नाही! मला स्वतःला या ठिकाणी पोहोचण्यासाठी "स्ट्रगल' करावा लागला हे खरं आहे. पण मी माझ्या खेळात पुरेसा परिपक्व नव्हतो, म्हणून मला संधी मिळाली नव्हती. त्याला माझं मराठी असणं हे कारण नव्हतं. पण जेव्हा मी स्वतःवर काम केलं, तेव्हा माझी निवड झालीच,' अशी भावना सध्याचा स्टार क्रिकेटपटू केदार जाधव याने आज (शुक्रवार) व्यक्त केली. पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजिलेल्या एका अनौपचारिक वार्तालापावेळी केदार बोलत होता. या वेळी त्याने उपस्थितांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.

पुण्यात नुकत्याच झालेल्या भारत-इंग्लंड सामन्यातल्या केदारच्या अविस्मरणीय खेळीच्या पार्श्वभूमीवर हा वार्तालाप घेण्यात आला होता. केदारचे वडील महादेव जाधव, संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभय आपटे, सचिव रियाज बागवान आदी या वेळी उपस्थित होते.

केदार म्हणाला, " म्हणतात ना, माणसाने नेहमी मोठी स्वप्नं बघावीत. मीही तशीच पाहिली होती. अर्थात, त्यासाठी हवी तेवढी मेहनत घेण्याची माझी तयारीही होती. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेने मला खूप आत्मविश्वास दिला. त्यावेळीच धावपट्टीवर पूर्णवेळ थांबून राहण्याचा निर्धार मी करू शकलो. आत्ताच्या इंग्लंड मालिकेला मी माझ्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' म्हणेन'

कट्ट्यावर बसणं आता बंद झालं !
"इंग्लंडविरुद्धच्या खेळीनंतर वैयक्तिक आयुष्य आजही तसंच आहे. पण 'सोशल लाईफ' मात्र खूप बदललं आहे आता. अलीकडे मी घरातून बाहेर पडू शकत नाही. सगळीकडे 'फॅन्स' असतात. त्यांचं प्रेम ते वेळोवेळी दाखवतात. माझं मित्रांसोबत कट्ट्यावर बसता येणंही आताशा बंदच झालं आहे. पण, असं असलं तरी आपल्या देशासाठी काही तरी करण्याची संधी मिळणं, हे मी खूप महत्त्वाचं मानतो''

असा विराट, असे धोनीभाई
"विराट कोहलीचा नेहमीच मला भक्कम पाठिंबा मिळत राहिला आहे! त्याला पाहूनच मला खूप प्रेरणा मिळते. जेव्हा खुद्द विराटच तुम्हाला 'तू आपला नैसर्गिक खेळ कर' असं म्हणतो, तेव्हा ती गोष्ट खूप आत्मविश्वास देऊन जाणारी असते. विराटप्रमाणेच 'धोनीभाईं'चाही मला खूप आधार आहे. त्यांच्यामुळे माझी प्रगल्भता वाढली. दबावाखाली काम कसं करावं, ते मला धोनीभाईंनी शिकवलं ! खरंतर, धोनीभाई आणि विराट फार वेगळे नाहीत. ते दोघेही उत्तम कर्णधार आहेत. विराटची ऊर्जा तुम्हाला प्रेरणा देते. तर, धोनीची स्थितप्रज्ञता..."

क्रिकेटसाठी सुरू केलं नॉनव्हेज खाणं !
"माझा जन्म नवसाने झालाय. "मुलगा जन्माला आला तर मांसाहार सोडणार' असा नवस माझ्या आईवडिलांनी केला होता. माझ्या जन्मानंतर त्यांनी मांसाहार खरंच सोडला. मीही अनेक वर्षं शाकाहारीच होतो. क्रिकेटसाठी मात्र मला मांसाहार सुरू करावा लागला. कुटूंबीयांनीही मला यासंदर्भात कधीच विरोध केला नाही.''

Web Title: No region bias for selection, says Kedar