तेंडुलकर करू शकला नाही, ते कोहलीने केले - वॉर्न 

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

​इंग्लंड हे असे एक केंद्र आहे की जेथे अजून कोहली चमकला नाही; पण आगामी इंग्लंड दौऱ्यात तो ती उणीव भरून काढेल. त्याच्यासाठी हा दौरा नक्कीच अविश्‍वसनीय ठरेल. 
 - शेन वॉर्न, ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू 

नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने आजच्या युगातील क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलर्स हे दोन महान फलंदाज असल्याचे म्हटले आहे. क्रिकेट कुठलेही असो, विराटने जी कामगिरी केली, ती अगदी सचिन तेंडुलकरलाही करता आली नाही, असे मत त्याने व्यक्त केले. 

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान वॉर्न म्हणाला,""ज्या पद्धतीने विराट एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळतोय, त्याला तोड नाही. आव्हानाचा पाठलाग करताना त्याने झळकावलेली शतकेच हे सांगतात. त्याच्यासारखी कामगिरी अगदी सचिनसह कुणालाच जमणार नाही.'' 

माझ्या क्रिकेट कारकिर्दीत सचिन आणि लारा हे दोन महान फलंदाज होते. सध्याच्या क्रिकेटमध्ये कोहली आणि एबी डिव्हिलर्स महान आहेत; पण त्यांच्यापैकी कुणाचे एकाचे नाव घेणे खूप कठीण आहे. वॉर्न म्हणाला,""सचिन आणि लारा सर्वांनाच माहीत आहेत. काय फलंदाज होते ते! पण, तो भूतकाळ झाला. सध्या कोहली आणि डिव्हिलर्स हे दोनच क्रिकेटपटू असे आहेत की, ते क्रिकेटच्या कुठल्याही प्रकारात अगदी सहज बसतात. कोहलीकडे जबरदस्त ऊर्जा आहे. क्रिकेटसाठी तो झपाटलेला असतो. आगामी दहा वर्षांनंतर सर्वच जण जसे आता सचिनबद्दल बोलतात, तसे त्याच्याबद्दल बोलू लागतील.'' 

Web Title: Not even Sachin Tendulkar could do what Virat Kohli has done says warne