Wimbledon 2019 : जोकोविचचा ग्रासकोर्टच्या राजाला शह; सलग दुसऱ्या वर्षी विबंल्डन विजेता

वृत्तसंस्था
सोमवार, 15 जुलै 2019

रॅफेल नदालविरुद्धचा उपांत्य फेरीतील विजय विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाने साजरा करण्याचे रॉजर फेडररचे स्वप्न भंगले. मोक्‍याच्यावेळी खेळ उंचावणाऱ्या नोवाक जोकोविचविरुद्ध फेडररला विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली. शंभर मिनिटांहून जास्त वेळ चाललेल्या निर्णायक सेटमध्ये शांतपणे खेळ करीत जोकोविचने विजेतेपदाचा पंच साधला. 

लंडन : रॅफेल नदालविरुद्धचा उपांत्य फेरीतील विजय विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील विजेतेपदाने साजरा करण्याचे रॉजर फेडररचे स्वप्न भंगले. मोक्‍याच्यावेळी खेळ उंचावणाऱ्या नोवाक जोकोविचविरुद्ध फेडररला विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात हार पत्करावी लागली. शंभर मिनिटांहून जास्त वेळ चाललेल्या निर्णायक सेटमध्ये शांतपणे खेळ करीत जोकोविचने विजेतेपदाचा पंच साधला. 

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील इंग्लंडची अंतिम लढत सुरु असलेल्या लॉर्डस्‌पासून काही अंतरावर पुरुष एकेरीतील टेनिसचा अंतिम सामना होता. त्यात इंग्लंड किंवा ब्रिटनचा कोणीही खेळाडू नसूनही चाहत्यांनी नेहमीप्रमाणेच गर्दी केली होती. त्यातही विम्बल्डनच्या हिरवळीवर मनापासून प्रेम करीत असलेल्या फेडररला जास्त पाठिंबा होता, पण अखेर जोकोविचची सरशी झाली. त्याने निर्णायक लढतीत 7-6 (7-5), 1-6, 7-6 (7-4), 4-6, 13-12 (7-3) असा विजय मिळविला. 

पाच तास रंगलेल्या या कमालीच्या तणावपूर्ण सामन्यात जोकोविचने पहिला आणि तिसरा सेट टायब्रेकरवर जिंकला. हे दोन्ही सेट जिंकल्यावर जोकोविचचा खेळ खालावला. त्याचा फायदा फेडररने घेतला. दुसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये फेडररने जोकोविचची केलेली सर्व्हिस ब्रेक सत्कारणी लावले होते. 

निर्णायक सेटमध्ये लेटस्‌ गो फेडरर, लेटस्‌ गो तसेच रॉजर... रॉजर... रॉजर असा गजर चाहत्यांनी केला तरीही जोकोविच शांत होता. दोघेही एकमेकांच्या क्षमतेचा कस बघत होते. अर्थातच त्यामुळे दोघांचीही चांगलीच शारीरीक तसेच मानसिक दमछाक झाली होती. अर्थातच निर्णायक सेटच्या अंतिम टप्प्यात कोणताही धोका पत्करण्याची त्यांची तयारी नव्हती. विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवरील ऑक्‍सिजन आता संपत आला आहे. समाजमाध्यमांवरुन होणारी टिप्पणी सामन्याचे चित्र दाखवत होती. 

एका दशकापूर्वी फेडररने रॉडिकविरुद्धचा निर्णायक सेट 16-14 असा जिंकला होता. त्या लढतीची आठवण या सामन्याने करुन दिली. निर्णायक सेटमध्ये दोघांनाही सलग दोन गेम जिंकता येत नव्हते. पंधराव्या गेममध्ये जोकोविचची सर्व्हिस भेदल्यावर फेडररला सोळाव्या गेममध्ये 40-30 आघाडीनंतर सर्व्हिस राखता आली नाही. त्यानंतरही अनेकदा जोकोविच तसेच फेडररने सर्व्हिस ब्रेक टाळताना मोक्‍याच्यावेळी खेळ ऊंचावला. 
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला जोकोविच विजेतेपद जिंकल्यावर कमालीचा शांत होता. त्याने कोणत्याही प्रकारे आनंद व्यक्त केला नाही. कदाचीत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात दिर्घवेळ चाललेली अंतिम लढत जिंकल्याचाच त्याला जास्त आनंद होता. त्याचबरोबर त्याला फेडररविरुद्धच्या विम्बल्डन अंतिम सामन्यातील धवल यशाची मालिका कायम राखली याचेच जास्त समाधान होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Novak Djokovic beats Roger Federer and wins Wimbledon 2019 champion