

Novak Djokovic
Sakal
संपूर्ण कारकीर्दीत २४ ग्रँडस्लॅम सिंगल्स अजिंक्यपदे व एक ऑलिंपिक गोल्ड ही एक कमाल कामगिरी आहे. एक ग्रँडस्लॅम सिंगल्स अजिंक्यपद म्हणजे एका ऑलिंपिक सुवर्णपदकाच्या बरोबरीचे म्हणायला हरकत नाही एवढी 'दर्जात्मक' स्पर्धा जगभरातून ग्रँडस्लॅम स्पर्धांसाठी असते आणि अशी २४ अजिंक्यपदे (व १ ऑलिंपिक गोल्ड) मिळविणाऱ्या टेनिसपटू नोवान जोकोविचचे बालपण आपण कल्पना करू शकणार नाही अशा युद्धजर्जर परिस्थितीत गेले आहे.
१९९९ साली सर्बियावर म्हणजेच जोकोविचच्या देशावर NATO राष्ट्रांचे युद्ध परिस्थितीत अतोनात बॉम्बिंग्ज् होत असत. छोटा जोकोविच तेव्हा ११ वर्षांचा होता. त्याचे दोन भाऊ, आई वडील (डीयाना व सर्जान) अशा सगळ्यांनी त्याच्या आजोबांच्या बेलग्रेड येथील निवासस्थानाच्या तळघरात असलेल्या खास युद्ध परिस्थितीत वापरासाठी बांधलेल्या बंकरमध्ये तब्बल ७८ सलग रात्री आश्रय घेतला होता. जोकोसाठी मानसिकदृष्ट्या अतिशय अस्वस्थ असा तो कालखंड होता. पुढचा क्षण काय घेऊन येईल याची अजिबात कल्पना नसलेली ती जोकोविचच्या आयुष्यातील अत्यंत अवघड फेज होती.