स्मिथ, वॉर्नरवर एक वर्षाची बंदी

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 मार्च 2018

विजय नेहमीच महत्त्वाचा असतो, पण तो कशामार्गाने मिळवितात हे जास्त महत्त्वाचे. स्मिथ, वॉर्नरची कृती चुकीचीच होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेली कारवाई योग्यच आहे.
- सचिन तेंडुलकर, भारताचा माजी क्रिकेटपटू

सिडनी - चेंडू कुरतडल्याप्रकरणी कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट बाद असल्याचा निर्णय मंगळवारी ‘थर्ड अंपायर’च्या भूमिकेत असलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला. ज्या दिवशी हे तिघे या प्रकरणी सापडले तेव्हाच त्यांची विकेट पडली होती. त्यांच्यावरील कारवाईचा अंतिम निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियावर अवलंबून होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कठोर भूमिका घेत कर्णधार स्टीव स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची आणि चेंडू कुरतडण्यासाठी मोहरा बनवण्यात आलेल्या कॅमेरुन बॅंक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घातली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या कठोर भूमिकेपाठोपाठ भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) देखील असेच पाऊल उचलत स्मिथ, वॉर्नरसाठी आयपीएलचे दरवाजे बंद केले. या दोन्ही कारवाईमुळे स्मिथ आणि वॉर्नर यांच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी चिंता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. 

पहिल्या कसोटीतील ड्रेसिंगरूममधील वाद, त्यानंतर तिसऱ्या कसोटीत थेट चेंडू कुरतडण्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंची मजल गेल्यामुळे मलिन झालेली क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा सुधारण्यासाठी आम्ही हे कठोर पाऊल उचलत  आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. खेळाच्या सभ्यतेला तडा जाणार असेल, तर खेळाडूंची अशी कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, हाच संकेत आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.  

आयपीएलही नाही
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दोषी खेळाडूंवर एक वर्षाची बंदी घातल्यावर ‘बीसीसीआय’ने आपली भूमिका स्पष्ट करीत स्मिथ, वॉर्नर यांना या मोसमासाठी ‘आयपीएल’चे दरवाजे बंद केले. आयपीएलचे कार्याध्यक्ष राजीव शुक्‍ला म्हणाले, ‘‘आम्ही याबाबत निर्णय आमच्या हातात ठेवला होता. त्यामुळे आम्ही आधी आयसीसी आणि नंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाची वाट पाहिली. त्यांनी निर्णय घेतल्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली. फ्रॅंचाईजी या दोघांच्या जागी बदली खेळाडू घेऊ शकतात. त्यांना तशी परवानगी देण्यात 
आली आहे.’’

यापूर्वीच्या बंदी...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरील एक वर्षाच्या बंदीनंतर आजपर्यंतच्या क्रिकेटमधील बंदीच्या महत्त्वाच्या घटनांचा हा ओझरता आढावा...
वर्णभेदाच्या लढाईत दक्षिण आफ्रिकेवर १९७० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची

२० वर्षांची बंदी
क्रिकेटमधील पहिल्या मॅच फिक्‍सिंग प्रकरणात (२०००) हन्सी क्रोनिए, महंमद अझरुद्दीन, अजय शर्मा, अता उर रेहमान, सलिम मलिक यांच्यावर आयुष्यभराची बंदी
उत्तजेक सेवन प्रकरणात २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नवर एक वर्षाची बंदी
शोएब अख्तर, महंमद असिफ यांच्यावर उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यावर अख्तरवर दोन, तर असिफवर एका वर्षाची बंदी. असिफ २००७ मध्ये याच प्रकरणी दोषी आढळल्यावर आणखी एका वर्षाची बंदी
उत्तेजक चाचणी संदर्भात ठावठिकाणा (व्हेअर अबाउट्‌स) सांगण्यास नकार दिल्याने वेस्ट इंडीजच्या आंद्रे रसेलवर २०१७ मध्ये एका वर्षाची बंदी
बांगलादेशाच्या शकिब अल हसनवर २०१४च्या मोसमात असभ्य वर्तन केल्याप्रकरणी दोन वेळा कारवाई. पहिल्या कारवाईत तीन सामन्यांसाठी निलंबन, तर दुसऱ्या कारवाईनंतर सहा महिन्यांची बंदी
वर्णभेदविरोधी टिप्पणी केल्याने झिंबाब्वेच्या मार्क व्हर्म्युलेनवर २००६ मध्ये झिंबाब्वेकडून आयुष्यभराची बंदी
पाकिस्तानच्या रझा हसनवर २०१५ मध्ये उत्तेजक सेवन चाचणीत दोषी आढळल्यामुळे दोन वर्षांची बंदी
स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात २०११ मध्ये पाकिस्तानच्या महंमद अमीर (५ वर्षे), सलमान बट (१० वर्षे), महंमद असिफ (७ वर्षे) कठोर कारवाई
पाकिस्तानच्या दानिश कानेरियावर कौंटी क्रिकेटमधील मॅच फिक्‍सिंग प्रकरणात २०१० मध्ये आयुष्यभराची बंदी
आयपीएलमधील स्पॉट फिक्‍सिंग प्रकरणात भारताच्या श्रीशांतवर आयुष्यभराची बंदी
(टीपः मॅच फिक्‍सिंग प्रकरणात अनेक खेळाडूंवर बंदीची कारवाई करण्यात आली आहे.)

Web Title: One-year ban on Smith Warner BCCI cricket Sydney