आता पाक मंडळाला कंठ फुटला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

2014 मध्ये दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका खेळण्याचा करार करण्यात आला होता, त्या वेळी पाक मंडळाकडून त्यांनीच स्वाक्षरी केल्या होत्या. या करारानुसार 2015 ते 2023 या आठ वर्षांत सहा मालिका होणे अपेक्षित होते.

कराची - आयसीसीच्या बैठकीत भारतीय क्रिकेट मंडळाची (बीसीसीआय) ताकद कमी झाल्यावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाला कंठ फुटला आहे. दोन देशांच्या क्रिकेट मंडळामधील करारानुसार भारत आमच्याशी खेळत नाही, त्यामुळे आमचे आर्थिक नुकसान होत आहे, अशी आवई उठवताना बीसीसीआयवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. 

दुबई येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीसाठी सर्व सदस्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही संधी साधून त्यांनी भारतीय मंडळाच्या प्रतिनिधीकडे तगादा लावला. पाकिस्तान मंडळाच्या कार्यकारी समितीचे कार्याध्यक्ष नजाम सेठी यांनी ट्विटवरून भारतीय मंडळाच्या विरोधातील नव्या पवित्र्याची माहिती दिली. सेठी पुन्हा पाकिस्तान मंडळाचे कार्याध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहेत.

2014 मध्ये दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका खेळण्याचा करार करण्यात आला होता, त्या वेळी पाक मंडळाकडून त्यांनीच स्वाक्षरी केल्या होत्या. या करारानुसार 2015 ते 2023 या आठ वर्षांत सहा मालिका होणे अपेक्षित होते. केंद्र सरकारकडून खेळण्यास परवानगी मिळत नसल्याचे कारण देत बीसीसीआयने पाकबरोबर खेळण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. मुंबईवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2007 पासून भारतीय संघ पाकविरुद्ध मालिका खेळलेला नाही. 

भारताला आठ वर्षांत 29 कोटी डॉलर 
महसूल विभागणीचा "बीग थ्री' फॉर्म्युला रद्द करून आयसीसीने टक्केवारीचे नवे मॉडेल तयार केले. त्यानुसार भारताच्या मिळकतीत मोठी घट झाली असली तरी इतर देशांपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. पुढील आठ वर्षांत भारताला 29 कोटी 30 लाख डॉलर मिळतील. त्यानंतर इंग्लंड मंडळाला 14 कोटी 30 लाख डॉलर, झिंबाब्वेला 9 कोटी 40 लाख डॉलर आणि ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका यांसारख्या पूर्ण सदस्यत्व असलेल्या इतर सात सदस्य देशांना प्रत्येकी 13 कोटी 20 लाख डॉलर मिळणार आहे

Web Title: Pakistan cricket board threatens to sue BCCI for not honouring MoU