या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताला हरवेल - मोईन

या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताला हरवेल - मोईन

लाहोर -  वर्ल्ड कपमधील भारताकडून हमखास होणाऱ्या पराभवाचा अपशकुन या वेळी पाकिस्तान नक्की संपुष्टात आणेल, असा विश्वास माजी यष्टिरक्षक मोईन खान याला वाटतो. सर्फराज अहमद याच्या नेतृत्वाखालील संघात तेवढे वैविध्य आणि पर्याय असल्याचे त्याला वाटते.

कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध पाकिस्तानवर आतापर्यंत सहा वर्ल्ड कप सामन्यांत पराभवाची नामुष्की ओढविली आहे. यंदा १६ जून रोजी मॅंचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत.

मोईनने सांगितले, की आमच्या सध्याच्या संघात भारतावर वर्ल्ड कपमधील पहिला विजय नोंदविण्याची क्षमता आहे, कारण संघात गुणवत्ता आहे, पर्याय आहेत, वैविध्यसुद्धा आहे. या संघात आता छान समन्वय जुळला आहे. आम्ही जिंकू असे मी म्हणतोय याचे कारण दोन वर्षांपूर्वी चॅंपियन्स ट्रॉफीमध्ये आमच्या संघाने भारताला हरविले होते. इंग्लंडमध्ये जून महिन्यात असणाऱ्या हवामानात आमचे गोलंदाज सरस ठरतील.

या स्पर्धेतील प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून मोईनने आधी भारताचे आणि मग इंग्लंडचे नाव घेतले. या वेळचा वर्ल्ड कप फार इंटरेस्टिंग होईल. भारताविरुद्ध विजयासाठी माझा पाकिस्तानला पाठिंबा राहील. आमच्या खेळाडूंचे मनोधैर्य उत्तम आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्याविरुद्ध आम्ही वन-डे सामने खेळलेले असतील. त्यानंतर आम्ही वर्ल्ड कपमध्ये उतरू.

मोईनने व्यवस्थापक व निवड समितीप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. वर्ल्ड कपसाठी सर्फराजला कर्णधार नेमण्यास त्याने पाठिंबा दर्शविला. त्याने सांगितले, की अकारण गदारोळ माजविण्यात आलेल्या प्रकरणामुळे त्याच्यावर बंदी आली. त्यानंतर कर्णधारपदावरून चर्चा झडण्याचे काहीच कारण नव्हते. सर्फराजला नेतृत्व करताना मी पाहिले आहे. तो ज्युनियर असल्यापासून मी त्याला ओळखतो. तो माझ्या नेतृत्वाखाली व प्रशिक्षणाखाली खेळला आहे. या घडीला पाकिस्तानचे नेतृत्व करण्यास त्याच्याहून सरस खेळाडू नाही हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो.

तीन आठवडे सराव शिबिर
वर्ल्ड कपपूर्वी इंग्लंडमध्ये तीन आठवड्यांचे सराव शिबिर आयोजित करण्याचे पाकने ठरविले आहे. यास मोईनने पाठिंबा दर्शविला. तो म्हणाला, की यामुळे आमच्या खेळाडूंना इंग्लंडमधील हवामानात आरामात जुळवून घेता येऊ शकेल. गेल्या अनेक वर्षांत इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केलेल्या संघांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. मे-जून महिन्यात हवामान लहरी असते. खेळपट्ट्यांवर दव असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com