Rawalpindi Pitch : रावळपिंडीत 3 दिवसात 7 शतके; जो रूटचा जुगाड देखील नाही आला कामी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Vs England Rawalpindi Pitch

Rawalpindi Pitch : रावळपिंडीत 3 दिवसात 7 शतके; जो रूटचा जुगाड देखील नाही आला कामी

Pakistan Vs England Rawalpindi Pitch : इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षांनी पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिली कसोटी रावळपिंडी येथे होत आहे. कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाहुण्या इंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजांची पिसे काढली होती. पहिल्याच दिवशी 4 शतकी खेळींसह 500 जास्त धावा करण्याचा विक्रम इंग्रजांनी केला होता. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी जी गत पाकिस्तानी गोलंदाजांची झाली तीच गत इंग्लंडच्या गोलंदाजांची देखील झाली. पाकिस्तानच्या फलंदाजांनी तीन शतके ठोकली आहेत. सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी दोन्ही संघांनी मिळून तब्बल 7 शतके ठोकली.

दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आपल्या गोलंदाजांना थोडा तरी फायदा मिळावा म्हणून जो रूट झटत होता. त्याने चेंडू शाईन करण्यासाठी एक वेगळाच जुगाड लावला. आयसीसीने चेंडू शाईन करण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर कायमची बंदी घातली आहे. त्यामुळे रूटने इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लिचच्या डोक्यावरील घाम लावून चेंडू शाईन करण्याचा प्रयत्न केला. सध्या सोशल मीडियावर हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 657 धावा केल्यानंतर पाकिस्तानने देखील आपल्या पहिल्या डावाची दमदार सुरूवात केली. पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्ला शफीफ आणि इमाम उल हक यांनी शतकी खेळी केली. तिसऱ्या दिवशीही पाकिस्तानच्या फलंदाजांनी विकेटवर ठिय्या मांडला होता. मात्र जॅक लिचने इमामला 121 धावांवर बाद करत 225 धावांची सलामी भागीदारी तोडली. यानंतर शफीफ देखील 114 धावा करून बाद झाला. दरम्यान, कर्णधार बाबर आझमने देखील शतक ठोकत संघाला 400 धावांच्या पार पोहचवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी पाकिस्तानच्या पहिल्या डावात 7 बाद 499 धावा झाल्या होत्या. तरी देखील पाकिस्तान अजून 158 धावांनी पिछाडीवर आहे.

रावळपिंडीवरील खेळपट्टीवर धावांचा पडलेला पाऊस पाहून क्रिकेट जगतातून पीसीबीवर टीकेची झोड उठत आहे. दरम्यान, भारताला कायम पाण्यात पाहणाऱ्या रमीझ राजांना याबाबत विचारले असता त्यांनी हे असं कसं होतयं हे माहितीच नाही म्हणत हात वर केले. त्यांनी कसोटी खेळपट्टी कशी असावी याचा कोड क्रॅक करणे जमत नसल्याचे मान्य केले.

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'