
Deepak Chahar : मलेशिया एअरलाइन्सवर चहर संतापला! 'बिझनेस क्लासमध्येही मिळाले नाही जेवण'
Deepak Chahar IND vs BAN ODI : बांगलादेशविरुद्ध तीन वनडे आणि दोन कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये गेला आहे. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होणार असून जिथे पहिला एकदिवसीय सामना 4 डिसेंबर रोजी खेळला जाईल. दरम्यान अशी एक घटना समोर आली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या घटनेचा खुलासा भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चहरने केला आहे. मलेशिया एअरलाइन्सवर नाराजी व्यक्त करत दीपक चहरने एक ट्विट केले आहे.
दीपक चहरने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत लिहिले की, 'मलेशिया एअरलाइन्ससोबत प्रवास करण्याचा अनुभव खूपच वाईट होता. सर्वप्रथम त्यांनी आम्हाला न कळवता आमची फ्लाइट बदलली. याशिवाय बिझनेस क्लासमध्ये जेवणही नव्हते. आता गेल्या 24 तासांपासून आम्ही आमच्या सामानाची वाट पाहत आहोत. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे उद्याच आम्हाला पहिला सामनाही आपल्याला खेळायचा आहे.
चहरच्या या खुलाशानंतर मलेशिया एअरलाइन्सला सोशल मीडियावर खूप वाईट रित्या ट्रोल केले जात आहे. दुसरीकडे या दौऱ्याबद्दल बोलायचे झाले तर हा दौरा सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मोहम्मद शमी दुखापतीमुळे बांगलादेश दौऱ्यावरील वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे, त्याच्या जागी उमरान मलिकचा समावेश करण्यात आला आहे. आता उमरान मलिकला संधी मिळाली तर तो या संधीचा फायदा उठवणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.