World Cup 2019 : चवताळलेल्या पाकचा किवींना दणका

babar.jpg
babar.jpg

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : पाकिस्तानने जणू 1992च्या स्पर्धेतील कामगिरीपासून प्रेरणा घेत यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत आणखी एक पाऊल पुढे टाकले. पाकिस्तानने बुधवारी झालेल्या सामन्यात स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या न्यूझीलंड संघाचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवाने न्यूझीलंडला फारसा फरक पडत नसला, तरी विजयाने पाकिस्तानने उपांत्य फेरीतील आपल्या आशा कायम राखल्या. 

प्रथम फलंदाजी करताना त्यांनी न्यूझीलंडला 6 बाद 237 असे रोखले होते. त्यानंतर पाकिस्तानने बाबर आझमच्या नाबाद शतकी खेळीला हॅरिस सोहेलच्या मिळालेल्या साथीमुळे 49.1 षटकांत 4 बाद 241 धावा केल्या. आतापर्यंत प्रतिस्पर्ध्यांना जेरकीस आणणारी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला पाकिस्तानविरुद्ध आठ गोलंदाज वापरूनही यश आले नाही. बाबर आझम 101 धावांवर नाबाद राहिला. सामन्याचा मानकरी तोच ठरला. 

विजयासाठी 238 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरवात चांगली नव्हती. फखर झमान लवकर बाद झाला. त्यानंतर इमाम उल हक देखील स्थिरावू शकला नाही. पण, त्यानंतर बाबर आझम आणि महंमद हफीझ यांनी संयमी फलंदजी करताना पाकिस्तानच्या डावाला स्थिरता आणली. ही जोडीच डोकेदुखी ठरत असताना विल्यम्सनने आपल्या हाती चेंडू घेतला. त्याने पाचव्या चेंडूवर महंमद हफीजला बाद केले. या तिसऱ्या यशानंतर मात्र न्यूझीलंड गोलंदाजांना यश हाती लागले नाही. बाबरला हॅरिस सोहेल याने मोलाची साथ केली. धावगतीचे समीकरण काहिसे वाढलेले असताना हॅरिसने दाखवलेली आक्रमकता न्यूझीलंडच्या गोलंदाजांचे खच्चीकरण करण्यास पुरेशी ठरली. सलग दुसऱ्या सामन्यात सोहेलने अर्धशतकी खेळी करून आपली निवड सार्थ ठरवली. बाबरने शानदार शतक करताना पाकिस्तानच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याचे एकदिवसीय कारकिर्दीमधील हे दहावे शतक ठरले. बाबर आणि सोहेल जोडीने चौथ्या विकेटसाठी 126 धावांची भागीदारी केली. पण, विजयासाठी दोन धावांची गरज असताना सोहेल धावबाद झाला. त्यानंतर र्कधार सर्फराजने अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून पाकच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 

त्यापूर्वी, पावसामुळे मैदान ओलसर असल्यामुळे एक तास उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात ढगाळ वातावरणातही न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला; परंतु पाकिस्तानच्या वेगवान माऱ्याससमोर त्यांची 5 बाद 83 अशी अवस्था झाली. या धावा करतानाही त्यांनी अर्धी षटके खर्ची घातली होती. दोनशे धावांचाही टप्पा कठीण वाटत होता, परंतु निशाम आणि ग्रॅंडहोम यांनी हात दिला. निशामचे शतक अवघ्या तीन धावांनी अपूर्ण राहिले. 

आत्तापर्यंतच्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांवर हुकमत गाजवणाऱ्या न्यूझीलंड फलंदाजीला आज खऱ्या अर्थाने आव्हान मिळाले. पहिल्या पाचपैकी तिघांना जेमतेम खाते उघडता आले. त्यांच्या या पडझडीची सुरवात महंमद अमीरने आपल्या पहिल्याच चेंडूवर केली. मार्टिन गुप्टिलने बाहेर जाणारा चेंडू यष्टींवर ओढावून घेतला. त्यानंतर दुसरा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीने कॉलिन मुन्‍रो, रॉस टेलर आणि लॅथम ही न्यूझीलंडची मधली फळी गारद केली. 

सलग दोन शतके करणारा केन विल्यम्सन आत्मविश्‍वासाने फलंदाजी करत होता. त्याने 41 धावाही केल्या; पण तोही आफ्रिदीचा बळी ठरला तेव्हा न्यूझीलंडवर खऱ्या अर्थाने दडपण आले होते. निशाम आणि ग्रॅंडहोम यांच्याकडे डाव सावरण्यावर भर देण्याशिवाय पर्याय नव्हता. धावगतीकडे त्यांनी दुर्लक्ष करून त्यांनी न्यूझीलंडचा डाव सावरण्याचे काम करताना अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी केली. 

संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 50 षटकांत 6 बाद 237 (केन विल्यम्सन 41 -114 चेंडू, 4 चौकार, जिमी निशाम नाबाद 97 -112 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, कॉलिन ग्रॅंडहोम 64 -71 चेंडू, 6 चौकार, 1 षटकार, महंमद अमीर 10-0-67-1, शाहीन आफ्रिदी 10-3-28-3) पराभूत वि. पाकिस्तान 49.1 षटकांत 4 बाद 241 (बाबर आझम नाबाद 101 -127 चेंडू, 11 चौकार, हॅरिस सोहेल 68-76 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, ट्रेंट बोल्ट 10-048-1, लॉकी फर्ग्युसन 8.1-0-50-1, विल्यम्सन 8-0-39-1)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com