34 वर्षीय पंकज अडवाणीचे 22 वे जगज्जेतेपद

वृत्तसंस्था
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पंकज अडवाणीने सलग चौथ्या जागतिक बिलियर्डस्‌ स्पर्धेतील दीडशे गुणांच्या प्रकारात जागतिक विजेतेपद जिंकले. 34 वर्षीय पंकजचे हे 22 वे जागतिक विजेतेपद आहे. त्याने सलग पाचव्या वर्षी किमान एक जागतिक स्पर्धा जिंकली आहे.

नवी दिल्ली : पंकज अडवाणीने सलग चौथ्या जागतिक बिलियर्डस्‌ स्पर्धेतील दीडशे गुणांच्या प्रकारात जागतिक विजेतेपद जिंकले. 34 वर्षीय पंकजचे हे 22 वे जागतिक विजेतेपद आहे. त्याने सलग पाचव्या वर्षी किमान एक जागतिक स्पर्धा जिंकली आहे.

पंकजने बिलियर्डस्‌मधील ट्‌वेंटी-20 समजल्या जात असलेल्या दीडशे गुणांच्या प्रकारात सहा वर्षातील पाचवे विजेतेपद जिंकले. त्याने निर्णायक लढतीत म्यानमारच्या नाय थ्वाय ओ याचा 6-2 (150-4, 151-66, 150-50, 7-150, 151-69, 150-0, 133-150, 150-75) असा पाडाव केला. त्याने उपांत्य फेरीत माईक रसेलला 5-2 असे पराजित केले होते.

पंकजने विश्रांतीस 3-0 आघाडी घेताना 145, 89 आणि 127 गुणांचे ब्रेक केले होते. पण विश्रांतीनंतरची पहिली फ्रेम पंकजला गमवावी लागली. पण याचा परिणाम काहीच झाला नसल्याचे पंकजने दाखवत आपली आघाडी 5-1 केली. सहाव्या फ्रेममध्ये तर त्याने दीडशे गुणांचा नाबाद ब्रेक केला. दीडशे गुणांच्या प्रकारात कधीही काहीही घडू शकते. या लढतीबाबत अंदाजच बांधता येत नाही. त्यामुळे सलग चौथे आणि सहा वर्षातील पाचवे विजेतेपद जास्त सुखावत आहे, असे त्याने सांगितले.

जेव्हा मी जागतिक स्पर्धेत सहभागी होतो, त्या वेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचेच लक्ष्य असते. सातत्याने जिंकत असल्यावरही ते कमी झालेले नाही. या विजेतेपदाने विजेतेपदाची भूक तसेच ते जिंकण्याचा जोष कायम असल्याचेच दाखवले आहे.
- पंकज अडवाणी

पंकजची जागतिक विजेतेपद
- जागतिक बिलियर्डस्‌ - वेळेची मर्यादा ः 8 (2018, 2015, 2014, 2012, 2009, 2008, 2007, 2005)
- जागतिक बिलियर्डस्‌ - गुणांची मर्यादा ः 7 (2019, 2018, 2017, 2016, 2014, 2008, 2005)
- जागतिक स्नूकर सांघिक विजेतेपद ः 1 (2018)
- जागतिक स्नूकर विजेतेपद ः 3 2017, 2015, 2003
- जागतिक सिक्‍स रेड स्नूकर विजेतेपद ः 2 (2015, 2014)
- जागतिक बिलियर्डस्‌ सांघिक विजेतेपद ः 1 (2014)
(पंकजची आजपासून जागतिक सिक्‍स रेड स्नूकर; तसेच जागतिक सांघिक स्नूकर विजेतेपद जिंकण्याची मोहीम).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pankaj advani won 22nd world championship

टॅग्स