आशियाई बिलियर्डस स्पर्धेत पंकज अडवानीला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

चंडिगड - सोळा वेळच्या जगज्जेत्या पंकज अडवानीने शुक्रवारी आशियाई बिलियर्डस स्पर्धेत सातवे विजेतेपद मिळविले. अंतिम फेरीच्या लढतीत त्याने भारताच्याच सौरभ कोठारीचा पराभव केला. लढतीच्या पहिल्या सत्रात विश्रांतीला कोठारीने 3-1 अशी आघाडी मिळविली होती. पण विश्रांतीनंतर अडवानीने नंतर सलग पाच फ्रेम जिंकून सहाव्या आशियाई बिलियर्डस आणि एकूण सातव्या आशियाई विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. याच वर्षी त्याने 6 रेड स्नूकर स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.

पिछाडीनंतर अडवानीने 92, 1-2, 81 असे ब्रेक घेताना कोठारीला एकही गुण मिळविण्याची संधी दिली नाही. अडवानीने 4-3 अशा आघाडीनंतर कोठारीला पुनरागमन करण्याची संधी दिली होती. मात्र त्याला ती साधता आली नाही. अडवानी म्हणाला, ""माझे हे सातवे आशियाई विजेतेपद आहे. मला जणू सातव्या स्वर्गात असल्यासारखे वाटत आहे. पाच वर्षांनी या स्पर्धेत खेळताना विजेतपदाला गवसणी घातली. 1-3 अशा पिछाडीनंतर सलग पाच गेम जिंकून विजेतेपदाला गवसणी घालताना मला आनंद वाटतो.''

Web Title: pankaj adwani win in asian billiards competition