Asian Qualifiers : वरुण, ईशाचा अचूक लक्ष्यवेध; आशियाई पात्रता फेरीत सुवर्णपदकावर मोहोर; ऑलिंपिक पात्रताही मिळवली

वीस वर्षीय वरुण तोमर व एकोणिस वर्षीय ईशा सिंग या युवा नेमबाजांनी शूटिंग रेंजवर लक्ष्याचा अचूक वेध
pistol shooters esha varun win olympic quotas with golds at asian qualifiers
pistol shooters esha varun win olympic quotas with golds at asian qualifiersSakal

जकार्ता : वीस वर्षीय वरुण तोमर व एकोणिस वर्षीय ईशा सिंग या युवा नेमबाजांनी शूटिंग रेंजवर लक्ष्याचा अचूक वेध घेत आशियाई पात्रता फेरीत आपआपल्या गटात सुवर्णपदक पटकावले आणि भारतासाठी पॅरिस ऑलिंपिक कोटा मिळवला. वरुण याने पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात व ईशा हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले.

आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिंपिकसाठी १५ कोटा मिळवले आहेत. टोकियो ऑलिंपिकमध्येही १५ ऑलिंपिक कोटा मिळवण्यात भारतीयांना यश मिळाले होते. यंदा भारताने त्याची बरोबरी केली असून नेमबाजांना नवा विक्रम प्रस्थापित करण्याची संधी असणार आहे.

वरूण याने अंतिम फेरीत २३९.६ गुणांची कमाई करताना सुवर्णपदकावर हक्क सांगितला. भारताच्याच अर्जुन चीमा याने २३७.३ गुणांसह रौप्यपदकाची कमाई केली. मंगोलियाच्या दावाखू एंखतायवान याने २१७.२ गुणांची कमाई करीत ब्राँझपदक जिंकले.

याआधी वरुण (५८६ गुण), अर्जुन (५७९ गुण) व उज्ज्वल मलिक (५७५ गुण) यांनी १७४० गुणांची कमाई करताना १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात सुवर्णपदकावर निशाणा साधला. इराणच्या नेमबाजांनी रौप्य आणि कोरियाच्या नेमबाजांनी ब्राँझपदक पटकावले.

आशियाई पात्रता फेरीत दमदार कामगिरी केल्यानंतर वरुण म्हणाला, माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा सौरभ चौधरी हा माझा चुलतभाऊ आहे. त्याच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा मला फायदा झाला.

पॅरिस ऑलिंपिकसाठी भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत १५ कोटा मिळवले आहेत. त्यामध्ये आणखी खेळाडूंची भर पडू शकणार आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यांत पॅरिस ऑलिंपिकसाठी आणखी एक पात्रता फेरी रंगणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट बुक करता येणार आहे. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या आशियाई पात्रता फेरीत भारतीयांनी सोमवारी सहा पदके जिंकली आहेत. यामध्ये सांघिक प्रकारात दोन सुवर्णपदकांचाही समावेश आहे.

पात्र ठरणारी तिसरी पाकिस्तानी

ईशा सिंगने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २४३.१ गुणांसह सुवर्णपदक; तर पाकिस्तानच्या किशमाला तलत हिने २३६.३ गुणांसह रौप्यपदक आणि भारताच्याच रिदम सांगवान हिने २१४.५ गुणांसह ब्राँझपदक पटकावले.

पाकच्या २१ वर्षीय तलत हिने पॅरिस ऑलिंपिकचा कोटा मिळवला. अशी कामगिरी करणारी ती पाकिस्तानची तिसरी नेमबाज ठरली आहे. ईशा, रिदम व सुरभी राव यांनी १७३६ गुणांची कमाई करताना सांघिक प्रकारात सुवर्णपदकही पटकावले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com