पूजा, नवजोतला चाचणीत जीवदान

पूजा धांदा
पूजा धांदा

मुंबई : जागतिक कुस्तीच्या ऑलिंपिक गटाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरलेल्या पूजा धांदा आणि नवजोत कौर यांनी ऑलिंपिक नसलेल्या गटात पात्रता मिळवली. यासाठी त्या दोघींना मॅटवरही उतरावे लागले नाही.

जागतिक कुस्तीतील ऑलिंपिकमध्ये नसलेल्या चार वजनी गटांसाठी सोमवारी लखनौत निवड चाचणी झाली. त्यानुसार पूजाने 59 किलो गटासाठी; तर नवजोतने 65 किलो गटासाठी पात्रता मिळवली. या गटात प्रवेशिकाच नव्हत्या. भारतीय कुस्ती महासंघाने या दोन गटातील एकंदर 25 कुस्तीगीरांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्यात या चाचणीतील सात कुस्तीगीरही होत्या.

ऑलिंपिक गटासाठीच्या चाचणीत पूजा 57 किलो गटात सरिता मोरविरुद्ध पराजित झाली होती. त्यामुळे तिची ऑलिंपिक पात्रता साध्य करण्याची संधी तूर्त हुकली; पण तिला गतवर्षीप्रमाणे जागतिक पदक जिंकण्याची संधी असेल. आशियाई विजेती नवजोत 68 किलो गटाच्या चाचणीत दिव्या काक्रणविरुद्ध पराभूत झाली होती. ती आता त्यापेक्षा तीन किलो वजन कमी असलेल्या गटात जागतिक स्पर्धेत खेळणार आहे.

सोमवारची चाचणी चार गटात होती; पण त्यासाठी तीनच लढती झाल्या. 55 किलो गटातील निर्णायक लढतीत ललिताने मीनाक्षीला 9-1 असे हरवले. त्यापूर्वी मीनाक्षीने किरणला 5-0 असे हरवले होते. कोमलने निक्कीला 3-2 असे हरवून 72 किलो गटाची पात्रता साध्य केली. जागतिक कुस्ती स्पर्धा कझाकस्तानमध्ये 14 ते 22 सप्टेंबरदरम्यान आहे.

भारतीय संघ : सीमा बिसला (50 किलो), विनेश फोगत (53 किलो), ललिता (55 किलो), सरिता मोर (57 किलो), पूजा धांदा (59 किलो), साक्षी मलिक (62 किलो), नवजोत कौर (65 किलो), दिव्या काक्रण (68 किलो), कोमल (72 किलो), किरण (76 किलो).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com