साईप्रणीत ठरला सिंगापूर सुपर 

वृत्तसंस्था
सोमवार, 17 एप्रिल 2017

जागतिक क्रमवारीत बी. साईप्रणीत आता तिसाव्या क्रमांकावरून विसाव्या क्रमांकापर्यंत मोठी झेप घेईल. त्याचे सध्या 37 हजार 322 गुण आहेत. आता या स्पर्धेतील विजेतेपदाचे त्याला साडेनऊ हजार गुण मिळतील; पण गतस्पर्धेत मिळवलेले 880 गुण वजा होतील. त्यामुळे त्याचे आता 45 हजार 992 गुण होतील.

मुंबई : अखेरपर्यंत हार मानायची नसते यावर कमालीचा विश्‍वास असलेल्या बी. साईप्रणीतने खराब सुरवातीनंतर सिंगापूर सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत बाजी मारली. पहिल्यांदाच सुपर सीरिज स्पर्धा जिंकलेल्या बी. साईप्रणीतने त्याचा सरावातील सहकारी तसेच भारताचा यापूर्वीचा एकमेव सुपर सीरिज विजेता असलेल्या किदांबी श्रीकांतला तीन गेमच्या चुरशीच्या लढतीत हरवले. 

श्रीकांतने यापूर्वी दोनदा सुपर सीरिज स्पर्धा जिंकली होती, तर दोघातील यापूर्वीच्या पाचपैकी चार लढतीत साईप्रणीतची सरशी झाली होती. साईप्रणीतचा खेळ जास्त चांगला होत आहे, हेच त्याने अंतिम लढतीत दाखवत अखेर 17-21, 21-17, 21-12 अशी बाजी मारली. 

श्रीकांत आणि साईप्रणीत हे सरावातील सहकारी. अंतिम लढतीत दोघे एकमेकांच्या कमकुवत बाजूवर हल्ला करीत होते. श्रीकांतने सुरवातीस ताकदवान ड्रॉप्स आणि स्मॅशवर भर दिला होता तर साईप्रणीतने त्याच्या नजाकतीवर. मात्र काही वेळातच साई प्रणीतने स्मॅश आणि ड्रॉप्सला नेटजवळील नाजूक टचची जोड दिली आणि विजय खेचून आणला. 

पहिला गेम गमावलेला साईप्रणीत दुसऱ्या गेममध्ये 1-8, तर तिसऱ्या गेममध्ये 1-6 मागे पडला होता. साईप्रणीतने आपली ताकद असलेल्या मनगटाचा वापर करीत नेटजवळील प्रभावी टच केले, तसेच श्रीकांतला प्रसंगी नेटजवळ खेचत त्याच्या डोक्‍यावरून बेसलाइनजवळ अचूक रॅलीज करीत मोलाचे गुण मिळवले. 

साईप्रणीतने दुसऱ्या गेममध्ये 1-6 पिछाडीनंतर 14 पैकी 10 गुण जिंकले. साईप्रणीतचे उडी मारून केलेले ड्रॉप्स तसेच प्रभावी रॅलीज श्रीकांतच्या डोकेदुखी ठरल्या.

त्याच्याकडून सर्व्हिस करतानाही चूक झाली. निर्णायक गेममध्ये साईप्रणीतचा खेळ सुरवातीच्या पिछाडीनंतर बहरत गेला. त्याने श्रीकांतला रॉंग फूटवर पकडले. ताकदवान स्मॅश आणि ड्रॉप्स प्रभावीपणे करीत साईप्रणीतने कारकिर्दीतील पहिले जेतेपद पटकावले. 

जागतिक क्रमवारीत विसावा? 
जागतिक क्रमवारीत बी. साईप्रणीत आता तिसाव्या क्रमांकावरून विसाव्या क्रमांकापर्यंत मोठी झेप घेईल. त्याचे सध्या 37 हजार 322 गुण आहेत. आता या स्पर्धेतील विजेतेपदाचे त्याला साडेनऊ हजार गुण मिळतील; पण गतस्पर्धेत मिळवलेले 880 गुण वजा होतील. त्यामुळे त्याचे आता 45 हजार 992 गुण होतील. या कामगिरीमुळे तो क्रमवारीत वीसच्या आसपास असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

जायंट किलर ते विजेता 

 • 2013 मध्ये सनसनाटी विजयामुळे प्रथम चर्चेत 
 • थायलंड ओपन स्पर्धेत पहिल्या फेरीत माजी ऑल इंग्लंड विजेत्या महंमद हाफिझ हाशीमला हरवले, त्यानंतर एखाद आठवड्यात ऑलिंपिक विजेत्या तौफिक हिदायतचा पराभव, हॉंगकॉंग सुपर सीरिज स्पर्धेत हू युन या चाहत्यांच्या लाडक्‍यास हरवले. 
 • 2010 च्या जागतिक कुमार स्पर्धेत ब्रॉंझ 
 • दोन वर्षे दुखापती तसेच हरवलेल्या फॉर्मने सतावले होते. 
 • गतवर्षी ऑल इंग्लंड स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ली चॉंगवर मात 
 • कॅनडा ओपन ग्रा. प्रि. स्पर्धेत विजेतेपद 
 • या वर्षाच्या सुरवातीस सय्यद मोदी स्पर्धेत उपविजेता 
 • सिंगापूर स्पर्धेत क्विओ बिन, आठवा मानांकित तॅनोंगसॅक तसेच ली डॉंग केऊन यांना हरवले. 

सुपर सीरिज अंतिम लढतीतील भारतीय 

 • 2014 चीन सुपर सीरिज : श्रीकांत विजेता 
 • 2015 इंडिया ओपन सुपर सीरिज : श्रीकांत विजेता 
 • 2015 कोरिया ओपन : अजय जयराम उपविजेता 
 • 2016 हॉंगकॉंग सुपर सीरिज : समीर वर्मा उपविजेता
Web Title: Praneeth stuns Srikanth to clinch Singapore Super Series title